जत, पुढारी वृत्तसेवा : सांगोला-जत राष्ट्रीय महामार्गावर सिद्धार्थ पॉलिटेक्निकल कॉलेजच्या जवळ कंटेनरच्या धडकेत अंगणवाडी सेविका ठार झाली. कमलाक्षी दाजीबा घोडके (वय- ३९, रा. शेगाव), असे अपघातात मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. १९) घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मूळच्या उमराणी येथील रहिवाशी असलेल्या कमलाक्षी घोडके यांचे माहेर उमराणी आहे. तर सासर तालुक्यातीलच शेगाव येथे आहे. उमराणी येथील घारगे वस्ती येथे त्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कमलाक्षी घोडके या शेगावहुन उमराणीकडे स्कुटीने निघाल्या असता जत-शेगाव रोडवरील सिद्धार्थ पॉलटेक्निकजवळ भरघाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने कमलाक्षी घोडके यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यानंतर जखमी घोडके यांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.