पुणे: दोन वेगवेगळ्या कारवायात मेफेड्रॉन जप्त, अमंली पदार्थ विरोधी पथकाची कोरेगाव पार्क, रविवार पेठेत कारवाई | पुढारी

पुणे: दोन वेगवेगळ्या कारवायात मेफेड्रॉन जप्त, अमंली पदार्थ विरोधी पथकाची कोरेगाव पार्क, रविवार पेठेत कारवाई

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने चौघांना अटक करताना त्यांच्याकडून 2 लाख 20 हजारांचे मेफेड्रॉन जप्त केले. त्यांच्याकडून इतरही 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ऋषीकेश अनिल पासलकर (25, रा. अपर डेपो, बिबवेवाडी, पुणे), प्रणव प्रकाश ठाकुर (रा.रविवार पेठ) यांच्यावर कोरेगावपार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

तर दुसरी कारवाई फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असून त्यांच्याकडून 1 लाख 4 हजारांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. विशाल नंदकुमार शिंदे (41, रा. शुक्रवारपेठ, खडक पोलिस लाईन) आणि जुनेद अफजल खान (रा. रविवार पेठ, पुणे) यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

अवैध धंद्याबाबत माहिती काढुन कारवाई करण्याच्या सुचना पोलिस आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यांच्या सुचनेनुसार 18 ऑक्टोबर रोजी वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर कोरेगावपार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पुणे-कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीजवळील लेन नंबर ए मधील द योगी रेस्टॉरंट समोर सार्वजनिक रोडवर ऋषीकेश पासलकर हा संशयीतरित्या सापडला. त्याच्याकडून 1 लाख 4 हजारांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. अधिक तपास करण्यात आल्यानंतर त्याला हे मेफेड्रॉन प्रणव ठाकुर याने दिल्याचे सांगितल्यानंतर त्यालाही रविवार पेठेतून अटक करण्यात आली.

दरम्यान रविवार पेठेतील सार्वजनिक रोडवर विशाल शिंदे हा संशयीतरित्या फिरत असताना त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून 1 लाख 15 हजारांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. त्याला हा पदार्थ जुनेद खानने दिल्याचे सांगितल्यानंतर जुनेदलाही याचप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक व त्याच्या पथकातील मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button