सांगली

सांगली : विट्याच्या पालखी दसरा शर्यतीत मूळस्थानची पालखी प्रथम

स्वालिया न. शिकलगार

विटा (सांगली) : पुढारी वृत्तसेवा – अत्यंत रोमहर्षक वातावरणात झालेल्या विट्याच्या दीडशे वर्षांहून अधिक परंपरेच्या दसरा पालखी शर्यतीत मुळस्थानच्या पालखीने अखेरच्या क्षणी बाजी मारली. प्रचंड भाविकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यावर्षी पारंपरिक मोठ्या उत्साहात दसऱ्याची ऐतिहासिक पालखी शर्यत पार पडली. ही शर्यत पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. हा दसरा पालखीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविकांसह तालुक्यातील देशभर पसरलेले गलाई व्यवसायिक आले होते. (सांगली )

येथील गांधी चौकातील काळेश्वर मंदिर ते खानापूर नाक्यावरील सिमोल्लंघन मैदानापर्यंतच्या रस्त्यावर लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. शर्यत मार्गाशेजारील इमारतींवर उभा राहून नागरिक शर्यतीचा आनंद घेतला. पालखी शर्यतीच्या निमित्ताने शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विजयादशमी दिवशी बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शर्यत सुरू झाली. तत्पूर्वी येथील श्री भैरवनाथ मंदिराजवळील मैदानात विटा येथील रेवणसिद्ध आणि श्रीक्षेत्र मुळस्थानच्या श्री रेवणसिद्ध नाथाच्या पालख्या आल्या.

यावेळी विट्याचे ग्रामदैवत भैरवनाथ, सिद्धनाथ, म्हसवड सिद्धनाथ देवाच्या पालख्या या ठिकाणी दाखल झाल्या. काळेश्वर मंदिरा जवळ एकत्रित सर्व पालख्यांतील श्रींच्या मूर्तींची आरती करण्यात आली. त्यानंतर विटा आणि मूळस्थान या दोन पालकांमध्ये शर्यत झाली. सुरुवातीपासूनच दोन्ही पालख्या एकमेकांना खेटून होत्या. दोन्ही बाजूचे समर्थक आपल्या पालखीसाठी धावत होते. दगडी पाण्याच्या टाकीपासूनच्या टप्प्यात विट्याची पालखी पुढे होती.

छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत विटा आणि मूळस्थानच्या पालखीत बरेच अंतर पडले होते. सुरुवातीपासूनच पालख्यांची आडवाआडवी सुरू होती. विट्याची पालखी पुढे निघून गेल्यानंतर मूळस्थानची पालखी पाठीमागून तितक्याच जोमाने पुढे गेली. यानंतर खानापूर नाक्यावरून पुढे निघाल्यानंतर मैदानात पुन्हा पालख्यांमध्ये आडवाआडवी झाली.

याचवेळी गर्दीतून मार्ग काढीत मुळस्थानची पालखी मैदानावर गेली आणि पालखी शर्यत जिंकली. त्यानंतर श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं असा गजर करीत श्री भैरवनाथ, श्री खरसुंडी सिद्धनाथ आणि श्री म्हसवड सिद्धनाथ देवाच्या पालख्या सवाद्य मिरवणुकीने सिमोल्लंघन मैदानावर दाखल झाल्या. 'नाथबाबाच्या नावानं चांगभलं' असा जयजयकार करीत भाविकांनी आरती झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. एकमेकांना सोन्याची देवाण-घेवाण करीत विजयादशमीचा आनंद लुटला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT