Vivek Bhingardeve Bridge Construction Objections
विटा : ‘अधिकारी आज ओढ्यावर वाट्टेल तसा पूल बांधून निघून जातील; मात्र भविष्यात पुराचे पाणी विटेकरांच्या घरात शिरले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?’ असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी धनगर ओढ्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० च्या सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. या कामाची तातडीने स्वतंत्र संयुक्त तांत्रिक पाहणी करून भविष्यातील संभाव्य पूरस्थितीचा धोका दूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रांताधिकारी विक्रम से बांधले यांना दिलेल्या निवेदनात भिंगारदेवे यांनी पुलाच्या बांधकामाच्या तांत्रिक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक पाण्याचा प्रवाह, ओढ्याची वहनक्षमता, पाण्याचा निचरा आणि अतिवृष्टीच्या काळातील संभाव्य पूरस्थिती यांचा पुरेसा तांत्रिक अभ्यास न करताच काम सुरू असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.
पूर्वी धनगर ओढ्याला सुमारे ११० अंशांचे वळण होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे ओढ्याचा प्रवाह थेट सुमारे ६५ अंशांवर आणण्यात आल्याचा दावा भिंगारदेवे यांनी केला आहे. निसर्गाच्या नैसर्गिक प्रवाहात अशा प्रकारे बदल केल्यास भविष्यात त्याचे गंभीर परिणाम विटा शहराला भोगावे लागू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
‘आज पुलाचे बांधकाम करणारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणेतील अधिकारी उद्या बदलीनंतर किंवा कार्यकाळ संपल्यानंतर येथून निघून जातील. पालिकेचे अधिकारीही बदलतील. मात्र, एखाद्या अतिवृष्टीच्या वेळी पाण्याचा प्रवाह तुंबून विटा शहरात पूर आला आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरले, तर त्या नुकसानीची जबाबदारी कोण स्वीकारणार?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
धनगर ओढ्यावरील पुलाचा विषय हा केवळ सिमेंट-काँक्रीटच्या बांधकामापुरता मर्यादित नसून, विटा शहरातील नागरिकांचे जीवित, मालमत्ता आणि भविष्यातील सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे भिंगारदेवे यांनी म्हटले आहे. प्रशासनाने केवळ विकासाच्या नावाखाली घाई न करता या कामाची तांत्रिक आणि पर्यावरणीय बाजू तपासावी, अशी मागणी त्यांनी केली.
पुलाच्या बांधकामापूर्वी धनगर ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहाचा आणि पूररेषेचा हायड्रोलॉजिकल अभ्यास करण्यात आला आहे का? बांधकाम मंजूर आराखड्यानुसारच होत आहे का? याचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील संबंधित तरतुदींचा विचार करून नियमबाह्य अथवा अनधिकृत काम आढळल्यास तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जोपर्यंत पुलाच्या कामाची स्वतंत्र संयुक्त तांत्रिक पाहणी होत नाही आणि भविष्यातील पूरस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री होत नाही, तोपर्यंत या कामाबाबतचा प्रश्न कायम राहणार असल्याचे भिंगारदेवे यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात सांगलीचे जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अभियंत्यांना ई-मेलद्वारे, तर विट्याचे प्रांताधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रारी व निवेदने दिल्याचे त्यांनी सांगितले.
‘आमचा विकासाला अजिबात विरोध नाही. मात्र, विकासाच्या नावाखाली निसर्गाची थट्टा करून भविष्यातील गंभीर संकट विटेकरांच्या माथी मारणे आम्हाला कधीही मान्य नाही,’ अशी स्पष्ट भूमिका विवेक भिंगारदेवे यांनी मांडली.