

विटा : "जे गाडे वाहतुकीला अडथळा ठरतायत, ते तातडीने काढून टाका. ओढ्यांवरील अतिक्रमणे काढा, लोकांना तुम्ही नाही तर मी शब्द दिलेत. आता वाईटपणा घेण्याची वेळ आलीय, माझा संयम संपला तर तुम्हाला ते पेलणार नाही", असा इशारा आमदार सुहास बाबर यांनी विटा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिला.
कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवड झाल्याबद्दल आमदार सुहास बाबर यांचा विटा नगरपालिकेच्यावतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, खुद्द आमदार सुहास बाबर यांचे थोरले बंधू आणि उपनगराध्यक्ष अमोल बाबर, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यासह बाबर गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार सुहास बाबर म्हणाले, "निवडणूक होऊन सहा महिने झाले, हा तुमचा प्रशिक्षणाचा काळ संपला आहे. आता शहराच्या विकासासाठी कठोर निर्णय घेऊन वाईटपणा घेण्यास सुरुवात करा, आता वाईटपणा घेण्याची वेळ आलीय, माझा संयम संपला तर तुम्हाला पेलणार नाही.
माझ्या दृष्टीने विटा शहरामध्ये पाण्याची समस्या सोडता दुसरी कोणतीही अडचण नाही. येत्या तीन महिन्यात नळपाणीपुरवठा योजना पूर्ण होत आहे. बदल करणे थोडासा त्रासदायक असतं. पण तो करावा लागेल. सगळी भाजीमंडई एका ठिकाणी आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. भाजीमंडई एकत्रित आणताना काही पाच ते दहा टक्के लोकांना त्रास झाला असेल पण शहरातील ट्रॅफिक समस्या संपविण्यात सकारात्मक परिणाम झाला आहे.
जे गाडे वाहतुकीला अडथळा ठरतायत आणि जे रेकॉर्डवर नाहीत, ते तातडी ने काढून टाका. अगदी माझा फोन आला तरी ऐकू नका, टेंभूचे पाणी तलावात जाण्यासाठी ओढ्यांवरील अतिक्रमणे काढा. बांधकाम परवानग्या घेताना लोकांना आर्थिक त्रास होता कामा नये. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम दोन-तीन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. येत्या दीड वर्षात शहराला रोज पाणी देण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत त्यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाची माहिती दिली. तसेच, ज्या मालमत्तांची नोंद पालिकेच्या रेकॉर्डवर नाही आणि त्या मुळे कर रूपाने मिळणारे उत्पन्न बुडत आहे, अशा मालमत्तांचे असेसमेंट करण्याचे आदेश देत अनधिकृत नळपाणी कनेक्शन अधिकृत करून पालिकेचा महसूल वाढवण्यावर भर द्या, विटेकर लोकांना तुम्ही नाही, तर मी शब्द दिले आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी मी कोणती ही किंमत मोजायला तयार आहे,शहराला शिस्त लावण्यासाठी मी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे असे सांगितले माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.नितीन चंदन शिवे यांनी सूत्रसंचालन केले.
विटा पालिकेच्या कारभाऱ्यांना बारामतीला नेणार
विटा शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बारामती शहराच्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय, खासगी शाळांच्या तुलनेत पालिकेच्या शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी शिक्षण सभापतींना केले.