Vita News |विट्यात महामार्गाचा लघुमार्ग कसा झाला ? उत्तर देताना अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी : आंदोलकांनी काम पाडले बंद !

मुख्याधिकाऱ्यांकडे केले बोट, 30 मिटरचा रस्ता झाला 21 मिटर
Vita News
विट्यात आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
Published on
Updated on

विटा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० हा विटा शहरात मात्र महामार्ग न राहता लघुमार्ग का झाला? या आंदोलकांनी विचारलेल्या प्रश्नाला नेमके उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्यांची अक्षरशः भंबेरी उडाली. अखेरीस अनुपस्थित असलेल्या विट्या च्या मुख्याधिकाऱ्यांकडे बोट दाखवून त्यांनी पळ काढला.

विटा शहरातून पूर्वीच्या राज्य मार्ग १० ची दर्जोन्नती (अपग्रेडेशन) होऊन नवीन राष्ट्रीय महामार्ग १६० झाला आहे. मात्र हा रस्ता मुख्य बाजारपेठ आणि रहिवासी भागातून जात अस ल्याने, काही ठिकाणी रुंदी ७ मीटर वाहतूक मार्ग आणि रस्त्यांच्या कडा सह एकूण १०-१२ मीटर (३९.५० फूट) आहे. कारण शहरी भागात ट्रॅफिक आणि इमारतींची बांधकामे यामुळे रस्ता तसा होता. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला, पण त्याची रुंदी मात्र कमी झालेली दिसत आहे. पूर्वी ३० मीटर असलेला हा रस्ता सध्या २१ मीटर पर्यंत कमी झालेला आहे. परिणामी हा रस्ता ‘महा‘ मार्ग राहण्याऐवजी लघु' मार्ग झाल्याचेच उघड झाले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी दुप्पट वाढण्या चीच शक्यता दिसत आहे.

या प्रकाराविरुद्ध आज शनिवारी प्रचंड संख्येने संतप्त विटेकर रस्त्यावर उतरले. सध्या या महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या गटारीचे काम सुरू आहे, ते काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याचे स्पष्ट होत आहे या विरोधात विटेकरांनी भाजपा नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकारी संतोष शेळके यांच्यासह आलेल्या पथकाला धारेवर धरले. तात्काळ काम बंद करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी विचारलेल्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना उत्तरेच देता आली नाहीत. ते निरूत्तर झाल्याने या कारनाम्यामागचा नेमका "आका "कोण ? असा जाब विचारत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

याबाबत वैभव पाटील म्हणाले,या राष्ट्रीय महामार्ग करताना शहरातील कोणत्याही मिळकतीला बाधा येवू नये म्हणून काही महिन्यापूर्वी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी रस्ते विकास महामंडळ नॅशनल हायवेच्या पुणे विभागीय सचिव श्रुती नाईक आणि संतोष शेळके यांनी पालिकेने ३० मीटरचा रस्ता दिला आहे त्याबाबतीत तडजोड केली जाणार नाही असे आम्हाला सांगितले होते. परंतु गेल्या काही दिवसापासून हा मार्ग २१ मीटरचा रस्ता करण्या चा घाट घातला जात आहे. पालिकेच्या हद्दीत या रस्त्यालगत पुर्वीची जी गटारे आहेत त्याच्या आत सहा ते आठ फूट खुदाई करून नवीन गटारी बांधण्यात येत आहेत. हा रस्ता पुर्वीपेक्षा लहान होत असेल तर त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणायचे तरी कसे ? आम्ही हे काम थांबविले.

यावेळी आंदोलकांनी अनेक धक्का दायक आरोप केले. त्यामध्ये काही धनदांडग्यांच्या इमारती वाचविण्यासाठी गावाला वेठीस धरून शहराचे विद्रुपीकरण करण्याचा हा घाट घातला असून कदापी हे सहन करणार नाही. या सर्व कारनाम्यांचा आका कोण आहे ? असे विचारत आंदोलकांनी अप्रत्यक्षरित्या सत्ताधारी मंडळी ना लक्ष्य केले. त्यामुळे नेमक्या कोणाच्या इमारती कुणाकडून वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर हे काम विटा पालिकेच्या हद्दीत असल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय होणार नाही ही काळ्या दगडावरची रेष असल्याने नेमके मुख्याधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून या कामास परवानगी दिली आहे, याची विचारणा आंदोलकांनी केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दुरध्वनीवरून परगावी असल्याचे सांगत टाळाटाळ केली. त्यामुळे विटा पालिकेच्या सध्याच्या मुख्याधिकाऱ्यांवर बोट दाखवून अधिकाऱ्यांनी अक्षरशः तेथून पळ काढला.

यावेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते अजित गायकवाड, नगरसेवक सुमित गायक वाड, नागरी हक्क संघटनेचे सुनिल सुतार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विवेक भिंगारदेवे, किरण तारळेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत राठोड, सचिन शितोळे, सुरेश मेटकरी, राजू राठोड, पदमसिंह पाटील, फिरोज तांबोळी, सागर सोनावले, नितिन कांबळे, प्रवीण डुबल, विपुल तारळेकर, माधव रोकडे, मयुरेश गुळवणी अविनाश चोथे यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते.

सोमवारी मुख्याधिकाऱ्यांना भेटणार : वैभव पाटील

राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सांगतात, विटा पालिकेने सांगितल्याप्रमाणे आम्ही रूंदीकरण करत आहोत. मात्र ते खरे नाही.इथं कुणाचे तरी मन राखण्यासाठी, कुणाला तरी बरे वाटावे, कुणाची तरी जागा वाचावी यासाठी हा प्रयत्न चालला आहे का ? आम्ही सोमवारी सकाळी दहा वाजता आम्ही सर्वजण मुख्याधिकाऱ्यांकडे जाणार आहोत. प्रांताधिकाऱ्यांना ही पाहणीवेळी उपस्थित रहा, अशी विनंती आम्ही केली आहे. असेही माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news