सांगली

Gram Panchayat Election Result: वाळवा तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी

अविनाश सुतार

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा :  वाळवा तालुक्यात चुरशीने झालेल्या ४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. ४ पैकी ३ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे. तर कारंदवाडी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे माजी जि.प. सदस्य संभाजी कचरे गटाला धक्का बसला आहे. येथे भाजप व विलासराव शिंदे गटाच्या पॅनेलची सत्ता आली आहे. (Gram Panchayat Election Result)

तांबवे येथे राष्ट्रवादीचे माजी जि.प.सदस्य लिंबाजी पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष अध्यक्ष नेताजी पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक दीपक पाटील यांच्या गटाला ९ जागा मिळ‍ाल्या असून या गटाचे सुभाष खराडे हे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत. शिरटे येथे राष्ट्रवादीचे रणजीत लाड यांच्या गटाची सत्ता आली आहे. या गटाला ६ जागा मिळाल्या असून राजेंद्र लाड हे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत. राजारामबापू कारखान्याचे संचालक दिलीप देसाई गटाला ३ जागा मिळाल्या आहेत. (Gram Panchayat Election Result)

कारंदवाडी येथे राष्ट्रवादीचे संभाजी कचरे यांच्या २५ वर्षांच्या एकहाती सत्तेला हादरा देत भाजपने राष्ट्रवादीच्या एका गटाच्या साथीने येथे सत्तांतर घडविले. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, संदीप सावंत, राष्ट्रवादीचे वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनेलचे हिम्मत पाटील सरपंचपदी विजयी झाले आहेत. त्यांनी संभाजी कचरे यांचा पराभव केला.

साटपेवाडी येथे ७ जागांपैकी राष्ट्रवादीच्या ४ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. एका जागेवर उमेदवार मिळाले नव्हते. २ जागेसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी १ जागा राष्ट्रवादीने तर १ जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. राष्ट्रवादीचे बाळासो साटपे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT