विटा; पुढारी वृत्तसेवा : विटा पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरील दोन आरोपींना सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. रोहित युवराज भिंगारदेवे आणि राहुल चंद्रकांत जाधव अशी त्यांची नावे असून ते अनुक्रमे फुलेनगर आणि साळशिंगे, विटा (Sangli) येथील रहिवाशी आहेत.
याबाबत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनूसार, जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांनी चोरी, दरोडे, खूनाचा प्रयत्न आदी प्रकारातील गुन्ह्यांच्या रेकॉर्डवरील आरोपींना हद्दपार करा अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रोहित युवराज भिंगारदेवे आणि राहुल चंद्रकांत जाधव या दोघांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले होते. या दोघांवर जबरी चोरी, घरफोडी, मारामारी तसेच खंडणी, सावकारी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. (Sangli)
या दोघांविरूद्धच्या दाखल गुन्ह्यानंतर त्यांना अटक झाली. मात्र न्यायालयामधून जामिनावर सुटल्यानंतरही पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवितास आणि मालमत्तेस धोका पोहचत आहे. शिवाय जनमानसात आणि विटा परीसरातील नागरीकांमध्ये याचा विपरीत परीणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुध्द दाखल गुन्ह्यांची माहिती एकत्र करुन त्यांना हद्दपार करण्यात यावे अशा सूचना दिल्या होत्या. त्यानूसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) अंतर्गत रोहित भिंगारदेवे आणि राहुल जाधव या दोघांना सांगली, सातारा, कोल्हापूर या ३ जिल्ह्यांमधून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस नाईक नवनाथ देवकते, पुंडलिक कुंभार, सुरेश भोसले, शशिकांत माळी, सागर निकम यांनी पूर्ण केली आहे.
हेही वाचा