वडगावमध्ये भरवस्तीत घरफोडी, 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास | पुढारी

वडगावमध्ये भरवस्तीत घरफोडी, 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : येथील एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान, ढोरे वाडा या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी घरफोडी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी शैलेंद्र रामचंद्र ढोरे (वय 51, रा.ढोरे वाडा, वडगाव मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि.10 रोजी सायंकाळी 6.30 ते मंगळवार दि.11 रोजी सकाळी 6.30 वाजणेच दरम्यान हा प्रकार घडला आहे.

फिर्यादी शैलेंद्र ढोरे हे तळमजल्यावर राहत असून त्यांचे भाऊ नगरसेवक राहुल ढोरे हे वरच्या मजल्यावर रहायला आहेत. दरम्यान सोमवारी सायंकाळ नंतर ढोरे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व घरातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठणसह दोन अंगठ्या, कानातील झुमके, कानातील टॉप, रिंगा, राजकोट टॉप असा सुमारे 1 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याच दरम्यान आंबेडकर कॉलनीतही घरफोडीचा प्रकार घडला असून मयुरेश्वर कॉलनीमध्येही एक घराचा कडी कोयंडा तोडला आहे. ही तीनही घरे दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिला खोत करत आहेत.

उकल न झाल्याने टोळी मोकाट !
दरम्यान, वडगाव शहरामध्ये गेल्या दोन तीन वर्षात झालेल्या घरफोडीचे गुन्हे उकल न आल्याने घरफोडी करणारांची टोळी मोकाट फिरत असून अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास कासोशीने करावा अशी मागणी होत आहे.

Back to top button