विटा : पुढारी वृत्तसेवा : दिवंगत प्रताप साळुंखे यांच्या विचारांचा आणि आचाराचा वसा पुढे नेत शिवप्रताप पतसंस्थेचा संपूर्ण दक्षिण भारतात विस्तार करू, असा विश्वास शेखरराव प्रताप साळुंखे यांनी व्यक्त केला.
येथील शिवप्रताप मल्टी स्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ऑल इंडिया सिल्व्हर रिफायनरी अँड सराफ असोसिएशनचे संस्थापक प्रताप साळुंखे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे संस्थेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. आज (दि.१६) संचालक मंडळाची विशेष सभा झाली. यात प्रताप साळुंखे यांचे चिरंजीव आणि सोने -चांदी व्यावसायिक शेखर साळुंखे यांची सर्वानुमते संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी नूतन अध्यक्ष शेखर साळुंखे म्हणाले की, प्रतापदादांच्या जाण्याने आपल्या सर्वांचीच अपरिमित हानी झाली आहे. तुम्ही सर्वांनी आपल्यावर टाकलेली ही जबाबदारी निश्चित पणाने सार्थ ठरवेन. तसेच आपण गेल्या दोन- तीन वर्षापासून बँकिंग व्यवहारकडे लक्ष देत होतो, मार्गदर्शन करत होतो. परंतु दादांनी जो या व्यवसायासाठी संस्थेसाठी घालून दिलेला जो आदर्श आहे, त्या पाठीमागे त्यांचा जो विचार आणि सर्वात महत्वाचे त्यांचा निःस्वार्थ सेवाभाव, पारदर्शकता आणि आपल्याशी असणारा जो ऋणानुबंध आहे. तो आपण जप ण्याचा प्रयत्न करू. दादांची कमी जाणवणार नाही, याचा आपल्यापरीने प्रयत्न करेन.
सर्व ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देणे आणि सर्वात महत्वाचे उच्चत्तम सुरक्षा म्हणजे आपली पै न् पै सुरक्षित ठेवण्यासाठी विश्वस्त म्हणून काम करू. दादांचा आधुनिकतेवर भर होता, त्याप्रमाणे खासगी आणि कार्पोरेट बँका मध्ये सेवा असतात. त्याच पद्धतीने किंबहुना त्याहून अधिक सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू.
व्यवस्थापनात आपण कॉर्पोरेट पद्धतीने बदल गेलेले आहेत. शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम करू, असा विश्वास आपणास देतो, असे साळुंखे म्हणाले. यावेळी सतीशराव साळुंखे, विठ्ठलराव साळुंखे आणि हणमंतराव सपकाळ आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे बहुतांशी सभासद, हितचिंतक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा