सांगलीत स्‍वाभिमानीचे आंदोलन पेटले; कारखान्याकडे जाणारी शंभरावर ऊसाची वाहने रोखली | पुढारी

सांगलीत स्‍वाभिमानीचे आंदोलन पेटले; कारखान्याकडे जाणारी शंभरावर ऊसाची वाहने रोखली

कसबे डिग्रज : पुढारी वृत्तसेवा ऊसाला एफआरपी अधिक पाचशे व गतवर्षीचे चारशे रुपये द्यावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटनेचे आंदोलन आता उग्र रूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी रात्री डिग्रज पुलावर दत्त इंडिया सांगली व सर्वोदय कारंदवाडी कारखान्याकडे जाणारी तीस ते चाळीस ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी अडवली आहेत.

डिग्रज पुलावर जवळपास दोन तास ऊस वाहतूक रोखली. यावेळी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, कुमार पाटील, सुनील फराटे, महादेव सिसाळ, अजय लांडे, विनायक जाधव, अजित काशीद यासह असंख्य शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी डिग्रज पुलावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनासमोर ठीया मारला.

शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालक, साखर कारखान्याचे कर्मचारी माजी उप सरपंच रमेश काशीद यांच्या चर्चेनंतर ऊसाची वाहने सोडण्यात आली. यामध्ये उद्यापासून ऊसतोड पूर्णपणे बंद करणे याच बरोबर वाहन मालकांनी ऊसाची वाहने भरून येऊ नये. याबाबत निर्णय घेण्यात आला.

रात्री नऊ नंतर येणारी ऊस वाहने कारखान्याकडे सोडली जाणार नाहीत, याबाबत सूचना केल्या होत्या. मौजे डिग्रज कसबे डिग्रज दरम्यान असणाऱ्या पुलावर सर्वोदय आणि दत्त इंडिया या कारखान्याकडे जाणारी वाहने अडवली, मात्र समज देऊन सोडली. त्यानंतर रात्री पुन्हा अनेक वाहने डिग्रज पुलावर आलेले लक्षात येताच या ठिकाणी ही वाहने वाढवण्यात आली. रात्रीपासून जवळपास 100 ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवण्यात आले असून वाहनाच्या लांबपर्यंत रांगा लागल्‍या आहेत.

आता आर या पारची लढाई करण्याचा निर्धार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी घेतला असून, कोणत्याही परिस्थितीत ही वाहने सोडणार नसल्याचे यावेळी भूमिका घेतली आहे. शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शेतकरी या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. रात्री उशिरा भोरा म्हसोबा या ठिकाणी दत्त इंडिया सांगलीकडे जाणारा ट्रॅक्टर अज्ञातांनी जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी संदीप राजोबा यांनी घटनास्थळी तातडीने घाव घेऊन छोट्या प्रमाणात लागलेली आग विझवली आणि हे वाहन सुरक्षित मौजे डिग्रज येथे आणण्यात आले. यामुळे पुढील अनर्थ टळला.

मात्र काही वाहने मुद्दाम उस वाहतूक करत आहेत. यामुळे काही नुकसान झाल्यास याची जबाबदारी कारखान्याने आणि ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी घ्यावी संघटनेच्या आंदोलन शांततेने सुरू आहे, मात्र कारखानदार आणि प्रशासन बग्याची भूमिका घेत असल्याचे लक्षात येते. यामुळे आता हे आंदोलन निर्णया शिवाय थांबणार नसल्याचे संदीप आजोबा म्हणाले. यावेळी रात्रीपासून ताटकळत असणाऱ्या वाहन चालकांना चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था संघटनेचे कार्यकर्ते व मौजे येथील ग्रामस्थांनी केली आहे. यामुळे शेतकरी संघटना फक्त आंदोलन करत नसून माणुसकीचे दर्शन या ठिकाणी घडत असलेले पाहायला मिळते.

दोन्हीं गावच्या शेतकरी व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखण्याची जबाबदारी घेतली आहे. शेतकऱ्यांनीही तोडी घेवू नयेत थोडी कळ सोसावी. डिग्रज पुलावरून कोणत्याही साखर कारखान्याला ऊस सोडणार नाही. यामुळे वाहन मालकांनी दक्षता घ्यावी. वाहन मालकांनी ऊसाची वाहन भरून जबरदस्तीने वाहतूक केली, तर जशास तसे उत्तर देऊ. कारखानदारांनी पुन्हा वसगडे प्रकरणाची वेळ येवू देवू नये. शासनानेही याच गांभीर्य लक्षात घ्यावं.

संदीप राजोबा. स्वाभिमानी शेतकरी संघटना.

ऊस दराच आंदोलन पेटले आहे. कारखानदारांनी ऊसदराचा प्रश्न मिटवला पाहिजे. याच बरोबर ऊस तोड बंद राहणार असल्याने मजूर बसून राहणार आहेत. वाहन मालक ऊस तोड मजुरांना घेवून कारखाना व जिल्हाधिकारी कार्यालय समोर बसतील. शेतकऱ्यांनी ऊस तोड घेवू नये. कारखानदारांनी ऊसदराचा तिढा लवकरात लवकर सोडवावा.

अजित काशीद. शेतकरी कार्यकर्ते.

Back to top button