वारणावती : पुढारी वृत्तसेवा : वारणावती (ता.शिराळा) येथील भर नागरी वस्तीत बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आमीन गुड्डापुरे यांच्या घराजवळ ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
वारणावती येथे गुड्डापुरे यांनी आपल्या राहत्या घरी कुत्रे पाळले आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास यांच्या घराजवळ असणाऱ्या रस्त्यावर बिबट्या सुमारे अर्धा तास बसून होता. त्यानंतर जवळच असणाऱ्या पाळीव कुत्र्यावर त्याने झडप घालून त्याला लक्ष्य केले. झटापट ऐकू आल्यामुळे गुड्डापूरे व त्यांच्या घरातील सर्वजण बाहेर आले. तो पर्यंत बिबट्याने अलगद कुत्र्याला घेऊन पलायन केले होते. हा सर्व थरार त्यांनी घरासमोर बसवलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
वारणावती वसाहतीला लागूनच जवळपास चांदोली अभयारण्य आहे. त्यामुळे अनेक प्राणी या परिसरात भटकंती करत असतात. यापूर्वी अनेक गवे वस्तीत नागरिकांनी पाहिले आहेत. वसाहतीमध्ये असणारे अनेक मोकाट कुत्रेही गायब झाली आहेत. बिबट्याचाही वसाहतीत वावर आहे. अशी बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. काल मात्र गुड्डापुरे यांच्या सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाल्यामुळे त्याचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे.
हेही वाचा