सांगली : उन्हाच्या तडाख्यातही भाजी आवाक्यात | पुढारी

सांगली : उन्हाच्या तडाख्यातही भाजी आवाक्यात

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत आहे. तरीसुद्धा बाजारात भाज्यांची आवक अद्याप चांगली आहे. पालेभाज्यांची आवक चांगली आहे. दरही कमी आहेत. ऐन उन्हाळ्यात भाज्या ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. उन्हाच्या तडाख्यातही भाज्यांना कमी दर मिळत असल्याने शेतकर्‍यांना फटका बसत आहे.

येथे जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. आवक चांगली आहे. दरही कमीच आहेत. पालक, मेथी, कोथिंबीर, तांदळ दहा रुपयास आहेत. कोबी, फ्लॉवर दहा ते वीस रुपयास आहे. वांगी, दोडका, कारले, टोमॅटो 40 ते 60 रुपये प्रतिकिलो आहेत. बाजारात टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. बटाटा 25 ते 30 रु. तर कांदे 20 रु. किलो आहेत. दुधी भोपळा प्रति नग दहा रुपये आहे. ओला वाटाणा प्रतिकिलोस 30 ते 40 रु. तर घेवडा, भेंडी साठ ते 80 रु. आहे. वाढत्या उन्हामुळे लिंबूला मागणी वाढत आहे. प्रतिनग लिंबू एक ते तीन रुपयास आहे. गाजर प्रतिकिलो चाळीस ते पन्नास रु. आहे. उन्हामुळे काकडीचे दर वाढत असून प्रतिकिलो 60 ते 80 रु. दर आहे. मक्याचे कणीस याचीही आवक वाढलेली आहे.

द्राक्षाची मोठ्या प्रमाणात आवक

आता द्राक्ष हंगाम सुरू आहे. द्राक्षाची मोठी आवक होत आहे. येथील बाजारात व स्टेशन रोडला द्राक्ष विक्रीसाठी मोठ्या संख्येने विक्रेते येत आहेत. गुणवत्तेनुसार प्रतिकिलोस 50 ते 80 रुपये दर आहे.

Back to top button