सांगली : कारखानदारीस आधुनिकतेची जोड हवी | पुढारी

सांगली : कारखानदारीस आधुनिकतेची जोड हवी

आष्टा; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सहकारी साखर कारखानदारी अडचणीत येत असताना आपण साखर कारखानदारी टिकविली, वाढविली आहे. आता नवी पिढी तिला आधुनिक रूप देईल, असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित 65 गावांना वारणेतून 6 टीएमसी पाणी काढून दिल्याचे मोठे समाधान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

कारंदवाडी येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या पहिल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक रमेश हाके व सर्व संचालक, माजी जि. प. सदस्य संभाजी कचरे, सरपंच पद्मजा कबाडे, उपसरपंच प्रमिला खोत, सोसायटीचे अध्यक्ष सदाशिव लवटे, उपाध्यक्ष माणिक वाडकर, ऊस भूषण सुरेश कबाडे, निवृत्त शिक्षिका सरोजिनी वाडकर यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते. अ‍ॅड. चिमण डांगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सरचिटणीस बाळासाहेब पाटील, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, शेखर माने, बाळासाहेब होनमारे उपस्थित होते.

यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत 4 कोटी 27 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना व कारंदवाडी सेवा सोसायटीच्या युनिट 2 च्या 56 लाख रुपयांच्या इमारत बांधकामाचा शुभारंभही करण्यात आला. अधीक्षक अभियंता संदीप हाके यांनी वीज मंडळाच्या सी.एस.आर. फंडातून 48 लाखाचा निधी मॉडेल स्कूलला दिला.

आमदार पाटील म्हणाले, लवकरच वाळवा तालुक्यातील सर्व सरपंच यांची बैठक घेऊन विकास कामांची चर्चा करणार आहोत. यातून तालुक्याच्या विकासाचा नवा आराखडा तयार होईल. आपण कारखान्यामध्ये नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. भविष्यात या संस्था व संघटनेत नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचे धोरण ठरविले आहे. साखराळे युनिटमध्ये इथेनॉलनिर्मिती आणखी क्षमता वाढवीत उर्वरित तीन युनिटची गाळप क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आहे.

प्रतीक पाटील म्हणाले, शेतीनिष्ठ कारंदवाडीने शेतीचे धडे दिले असून आपल्या गावात माझा पहिला सत्कार होत असल्याचा आनंद आहे. जयंत पाटील यांनी अडीच वर्षांत तालुक्याच्या विकासाला 450 कोटींचा निधी आणला आहे. काम करताना समोरचा माणूस कोण आहे याचा कधीही त्यांनी विचार केला नाही. अविनाश पाटील म्हणाले, आ. पाटील यांनी मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पी.एच.सी. सारखे उपक्रम दिले आहेत. नूतन संचालक रमेश हाके, माजी संचालक श्रेणिक कबाडे, संभाजी कचरे, सरपंच पद्मजा कबाडे यांनी सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रारंभी माजी जि. प. सदस्य संभाजी कचरे यांनी स्वागत केले. माजी पं. स. सदस्य जनार्दन पाटील, संचालक बाळासाहेब पवार, कार्तिक पाटील, प्रदीप कुमार पाटील, रघुनाथ जाधव, विठ्ठल पाटील, दादासो मोरे, मेघा पाटील, डॉ. सौ. योजना शिंदे, प्रताप पाटील, शैलेश पाटील, हणमंत कांबळे, राजकुमार कांबळे, रामराव पाटील, युवक राष्ट्रवादीचे संग्राम जाधव, शिवाजी चोरमुले उपस्थित होते. सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील खोत यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button