इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : इस्लामपूर नगरपालिकेतील पाच वर्षाच्या सत्तेतून पायउतार होताच सत्ताधारी विकास आघाडी – शिवसेनेने पालिकेच्या सभागृहात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमा लावल्या. या प्रतिमा लावण्यात याव्यात असा ठराव सभागृहात यापुर्वी करण्यात आला होता.
या सभागृहात यापूर्वी स्व. लोकनेते राजारामबापू पाटील व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या दोन मोठ्या प्रतिमा पिठासीन अधिकाऱ्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आल्या आहेत. तसेच दिवंगत नगराध्यक्षांची तैल चित्रेही सभागृहात लावण्यात आली आहेत. याच सभागृहात स्व. वसंदादांची प्रतिमा लावण्याचा ठराव यापूर्वी सन १९८५ साली करण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नव्हती.
तर विकास आघाडी व शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्याचा ठराव करण्यात आला होता. शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार यांनी हा ठराव मांडला होता. या ठरावांची सोमवारी (दि.३) रोजी अंमलबजावणी करत सत्ताकाळाच्या शेवटच्या दिवशी विकास आघाडी – शिवसेनेने या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा सभागृहात लावल्या.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार, आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार, नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार, मंगल शिंगण, सीमा पवार, अन्नपुर्णा फल्ले यांच्याहस्ते या प्रतिमांचे अनावरण झाले. मुख्याधिकारी वैभव साबळे व सर्व प्रशासन प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे सर्व व विकास आघाडीचे काही नगरसेवक यावेळी उपस्थित नव्हते.
हेही वाचलंत का?