सांगली / तासगाव :
पुढारी वृत्तसेवा
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारपासून सांगलीसह जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी दिवसभर आणि मध्यरात्रीपर्यंत तासगाव शहरासह मंडलातील गावांत अतिवृष्टी झाली. 24 तासामध्ये तासगाव मंडलात तब्बल 71 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागाला मुसळधार अशा पावसाने झोडपून काढले. सांगली, मिरज आणि पूर्व भागातही जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यात सांगली शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत होता. आता जिल्ह्यातील काही भागातही पावसाने जोर धरला आहे. मघा नक्षत्रात पहिल्यांदा विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. शुक्रवारी सांगली शहरात सायंकाळी सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळी नऊपर्यंत सुरूच होता. पावसाने जोर धरल्याने शेतीतील कामे खोळंबली आहेत.
शुक्रवारी तासगाव तालुक्यात मंडलनिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)
मंडल पाऊस
तासगाव 71
मणेराजुरी 54
विसापूर 23
येळावी 47
मांजर्डे 31
वायफळे 27
सरासरी 37
शनिवारीही दिवसभर पाऊस सुरूच होता. सायंकाळी मिरज पूर्व भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाणलोट क्षेत्रातही पाऊस वाढल्याने पाणीपातळीत किंचीत वाढ झालेली आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असला तरी कोयना धरणातून अद्यापही विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. शनिवारी कोयना परिसरात 26 मिलिमीटर, नवजा 41, तर महाबळेश्वरमध्ये 57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तासगाव तालुक्यात पावसामुळे ओढे-नाले भरून वाहते झाले आहेत. येरळा आणि अग्रणी नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहू लागले होते. या भागातील द्राक्षबागा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत. पूर्व भागात द्राक्षबागांचे वाफे पाण्याने भरलेले आहेत.शुक्रवारपासून तासगाव शहर आणि तालुक्यातील सर्व मंडलातील गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यात दिवसात सरासरी 37 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्यरात्रीच ओढे आणि नाल्यांना पुन्हा पूर आला आहे. तालुक्यातील तासगाव, सावळज, मणेराजुरी, येळावी, विसापूर, मांजर्डे मंडलातील सर्वच गावांना मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे.
मान्सूनमध्ये होणारा पाऊस हा संततधार असतो. एकसारखा पाऊस होत असतानाही वार्याचीही गती मंदावते. मात्र, यावर्षी प्रथमच अद्यापही मान्सून मध्यावरच असताना विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होत आहे. यामुळे शेतकर्यांसह जाणकार आश्चर्य व्यक्त करत आहेत.