बारामती तालुक्याच्या पश्चिम भागाला शनिवारी (दि. 17) जोरदार पावसाने तडाखा दिला. मुरूम, वाणेवाडी, मळशी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. याशिवाय निंबुत, गडदरवाडी, खंडोबाचीवाडी, फरांदेनगर, वाघळवाडी, करंजेपूल, करंजे, सोमेश्वर मंदिर परिसर आदी भागांत मुसळधार पाऊस झाला.
गेल्या पंधरा दिवसांपासून या भागात पावसाने विश्रांती घेतली होती. शनिवारी रात्री तब्बल दोन तास झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पहिल्यांदाच झालेल्या एवढ्या मोठ्या पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर आला. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या पावसाने ऊस, बाजरी व सोयाबीन आणि भाजीपाला पिके पाण्याखाली गेली. फुलोर्यात आलेले बाजरी पीक जमीनदोस्त झाले. काही ठिकाणी ऊसही आडवा पडला. पावसामुळे पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले.गेली आठ दिवसांपासून या भागात प्रचंड उष्मा होता. उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना शनिवारी झालेल्या पावसाने दिलासा मिळाला.
दिवे (ता. पुरंदर) परिसरात शनिवारी (दि. 17) रात्री 10 च्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. या पावसाने शेतांसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बाधित शेतकर्यांकडून होत आहे.
चिंचावले परिसरात पावसाचा जोर प्रचंड होता. या पावसाने वाटाणा, घेवडा, मका, बाजरी पिकात पाणीच पाणी साचून ती सडण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे. तर अंजीर, सीताफळ बागेत देखील प्रचंड पाणी साचले आहे. बागेतील खते पूर्णपणे वाहून गेली आहेत. ढुमेवाडीहून झेंडेवस्ती, लडकतवस्ती येथे जाणारा साकव पूल वाहून गेला.पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगतच्या तानाजी झेंडे, चंद्रकांत झेंडे, दादा झेंडे, नारायण झेंडे यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे या नागरिकांनी रात्र जागून काढली. पवारवाडीनजीक पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पुलाला भगदड पडले असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.