शशिकांत सावंत
महापालिकांचा रणसंग्राम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. कोकणातील 9 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास दोन कोटी मतदार आपले कारभारी ठरवणार आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची मुंबई महापालिका ठाकरे युती राखणार की महायुतीकडे जाणार याची उत्सुकता सर्वांना आहे. याशिवाय राज्यातील 28 आणि कोकणातील 8 असा हा महापालिकांचा रणसंग्राम मंगळवारी संपला असतानाच जिल्हा परिषदेचा रणसंग्राम सुरू झाला आहे. राज्यात एकुण 32 जिल्हा परिषदांपैकी 12 जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात जाहीर झाली. यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. त्याचबरोबर 32 पंचायत समितीच्या निवडणुकाही कोकणात होणार आहेत. तर राज्यात हा आकडा 125 पंचायत समित्यांचा आहे.
कोकणातील जिल्हा परिषदांमध्ये प्रामुख्याने राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले नितेश राणे, उदय सामंत, भरत गोगावले यांची प्रतिष्ठा यानिमित्ताने पुन्हा एकदा पणाला लागणार आहे. विशेषत: रायगडमध्ये नगरपालिका निवडणुका भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झाली होती. तर शिवसेना स्वबळावर लढली होती. या जिल्ह्यातील एकुण 10 नगर पालिकांपैकी महाड, खोपोली, माथेरान, कणकवली, मालवण अशा नगरपालिका शिवसेनेने स्वबळावर जिंकल्या होत्या. तर रत्नागिरीत भाजप बरोबर युती करून जिंकल्या होत्या. आता शिवसेना भाजप युतीचे जिल्हा परिषदांत काय होणार हे अद्याप ठरलेले नाही. परंतु रायगडमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी युती होईल असे सांगून शिवसेनेला डिवचले आहे.
नगरपालिका निवडणुकांत भाजप-राष्ट्रवादी युतीने प्रामुख्याने कर्जत, पेण, रोहा, मुरूड अशा नगरपालिका जिंकून आपला असा नवा पॅटर्न तयार केला होता. तर, अलिबागमध्ये शेकापने आपला गड राखला होता. सिंधुदुर्गात आमदार असलेल्या डॉ. निलेश राणे यांनी करिष्मा दाखवला होता. तर भाजपचे नेतृत्व करत असलेल्या नितेश राणेंना वेंगुर्ले सावंतवाडीत यश आले होते. रत्नागिरीत उदय सामंत यांनी आपली ताकद दाखवली होती. हा सर्व शहरी मतदारांचा कौल होता. मात्र जिल्हा परिषदेत ग्रामीण मतदारांचा कौल कुणाकडे हे पाहायला मिळणार आहे.
कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई आणि मुंबई उपनगर असे सात जिल्हे येतात. महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, वसई विरार, मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी अशा शहरी मतदारंचा कौल समोर येणार आहे. या महापालिका निवडणुका 15 ला होत असून 16 ला मतमोजणी होणार आहे. त्या पाठोपाठच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा रणसंग्रामही सुरू झाला आहे. कारण निवडणूक आयोगाने या निवडणुकीचीही घोषणा केली आहे.
नगरपालिका निवडणुकीत सत्तारूढ शिवसेना भाजप आमनेसामने ठाकले होते. त्यामुळे कोकणातील हा रणसंग्राम आरोपांच्या फैरी झाडणारा आणि महायुतीतीलच पक्षांचे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आव्हान असे रोमांचकारी क्षण अनुभवायला मिळत होते. त्यानंतरचा टप्पा हा महापालिकांचा होता. यामध्ये नगरपालिकेतील पुर्वानुभव लक्षात घेउन महायुतीतील भाजप शिवसेनेने महत्वाच्या ठिकाणी युती करण्याचा निर्णय घेतला. यात मुंबई,ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पनवेल, भिवंडी अशा सात महापालिकात महायुती म्हणून तर मीरा भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई या तीन महापालिकांत भाजप शिवसेनेत आमने सामने लढती पाहायला मिळाल्या.
खरं तर ही निवडणूक गाजली आणि वाजली ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत स्थान न मिळाल्याने. आता जिल्हा परिषदांमध्ये महायुतीच्या तीन पक्षांमध्ये नेमके काय होईल हे पाहणेही औत्सुक्याचे असेल. महापालिकेत दोन ठाकरे एकत्र आल्याने कोकणातील सर्वच महापालिकांमध्ये ठाकरे फॅक्टरचा प्रभाव प्रचारात पाहायला मिळाला. मात्र, मतपेटीतून काय निर्णय येतो यावरच या युतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. आता जिल्हा परिषदेचा जो रणसंग्राम सुरू होत असल्याने ठाकरे ब्रँड इथेही पाहायला मिळणार का? हे येत्या काही दिवसात समजेल. जिल्हा परिषदेचा पहिला टप्पा हा कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यापुरताच मर्यादित आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक 5 फेब्रुवारीला होत आहे. तर मतमोजणी 7 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे महापालिकेची रणधुमाळी संपताच जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली पहायला मिळेल. आता राजकीय पक्षांची पुन्हा कसोटी लागेल. कोकणातील मंत्री आणि विरोधी पक्षातील महत्वाचे नेते आमने सामने पाहायला मिळतील. यात भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रशांत ठाकूर तर शिवसेनेकडू उदय सामंत, भरत गोगावले, ठाकरे शिवसेनेचे भास्कर जाधव, विनायक राऊ त, तर राष्ट्रवादीचे आमदार संदेश निकम, रायगडमध्ये शेकाप नेते जयंत पाटील अशा नेत्यांसाठीही हा प्रतिष्ठेचा सामना असेल. कोकणात आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठाणे आणि पालघर जिल्हा परिषद निवडणुका मात्र लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे या रणसंग्रामाला काही काळ वाट पाहावी लागेल. एकूणच महिन्याभरात झालेल्या महापालिका निवडणुकांचा क्षीण उतरण्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामाला सर्वच राजकीय पक्षांना सामोरे जावे लागेल. कारण कोकणातील तीन महत्वाच्या जिल्हा परिषदा पहिल्या टप्प्यात आहेत.