

पनवेलः प्रकल्पग्रस्तांसाठी सरकार विरोधी आंदोलन करून प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्के योजनेचा नियम बनविण्यासाठी भाग पाडणा-या दि. बा. पाटील यांचा मंगळवारी सकाळी जन्मशताब्दी दिन साजरा होत असतानाच करंजाडे येथील काळभैरव मंदीरासमोर प्रकल्पग्रस्त तरूणांचा समुह आपसात भिडलेे.
नवी मुंबई विमानतळातील स्वच्छता विभागातील कंत्राटी कामगाराला नोकरीवरून काढून टाकल्याच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. करंजाडेतील प्रकल्पग्रस्तांचे वाद चव्हाट्यावर येऊ लागल्याने प्रकल्पग्रस्त तरुण नेतृत्वहीन झाल्याची चर्चा पनवेल उरणमध्ये सुरू आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात प्रकल्पग्रस्तांच्या दोन्ही गटाविरोधात परस्परांविरोधी तक्रार नोंदविण्यात आली आहे. मात्र याच मारहाणीत महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रार महिलेने दिल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरीता झांजुर्णे हे चौकशी करत आहेत.
भर उन्हात मंदीराच्या पायथ्याशी सुरू असणाऱ्या या कार्यक्रमावेळी लावलेल्या एका फलकावर ज्या कंत्राटी कामगाराला कामावरून काढले त्या तरूणासह त्याचे कुटूंबिय ज्या प्रकल्पग्रस्तांमुळे नोकरी गेली असा संशय होता. त्यांचे फोटो फलकावर लावून त्या फोटोवर फुल्या मारून निषेध हे कुटूंबिय तेथेच निषेध व्यक्त करत होते. ज्यांचे फोटो लागले त्यांना राग आल्याने आमचे फोटो का लावले असा जाब विचारल्यानंतर फोटो लावणा-यांच मारहाण केली. दोन्ही गटाने मारहाण केल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत. या मारहाणीचे सर्व चित्रिकरणाचे पुरावे घेऊन मारहाण झालेला गट पनवेल शहर पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांच्याविरोधातही इतर प्रकल्पग्रस्तांच्या समुहाने अगोदरच तक्रार केल्याचे सांगून त्यांचीही तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली.
या मारहाणीचे व्हिडीओ समाज माध्यमांवरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत राहिल्याने नागरिकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
विमानतळात नुकताच नोकरीला लागलेला वाघिवली गावातील ऋतिक गावंड याला कंत्राटदार कंपनीने सेल्फी काढण्याच्या शुल्लक कारणावरून काढून टाकल्याने त्याचे कुटूंबियांनी या घटनेनंतर प्रकल्पग्रस्त संघटनेने केलेल्या दबावामुळे आम्हाला निषेध करण्याची वेळ आल्याचे सांगीतले.