उल्हासनगर : आपले मतदान कुठे आणि कोणत्या केंद्रात आहे याची माहिती मिळण्यासाठी मतदार हे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या व्होटर स्लिपवर निर्भर राहत होते. स्लिप मिळालीच नाही तर मतदानाचा हक्क बजावण्याच्या उद्देशाने रोडवर लावण्यात आलेल्या बूथवर शोधाशोध करत होते. मात्र उल्हासनगर महानगरपालिकेने डिजिटल क्रांती केली असून निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते एका क्लिकवर ऑनलाईन मतदार केंद्रांची माहिती देणाऱ्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांची व्होटर स्लिपची प्रतीक्षा संपली आहे.
या पोर्टलमध्ये मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा पत्ता आणि तेथे पोहोचण्यासाठी नकाशा उपलब्ध असेल. मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि इतर वैयक्तिक माहिती तत्काळ पाहता येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे आणि प्रभागांची रचना सहज पाहता येईल. अशा प्रकारची नावीन्यपूर्ण आणि तंत्रस्नेही संकल्पना राबविणारी उल्हासनगर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य संकेतस्थळावर निवडणुकीशी संबंधित सर्व महत्त्वाचे दस्तावेज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच वैध नामनिर्देशन पत्रे आणि माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी आणि पुरवणी मतदार यादी, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नियुक्ती आदेश, प्रारूप व अंतिम प्रभाग रचना आणि सुधारित अधिसूचना या माहितीचा समावेश करण्यात आला आहे.
पोर्टलच्या उद्घाटन प्रसंगी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तिडके, गणेश सांगळे, विशाल जाधवर, विजयकुमार वाकोडे, मुकेश पाटील, डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गोरे, उपायुक्त (निवडणूक) विशाखा मोटघरे, जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त गणेश शिंपी उपस्थित होते.