Tringalwadi Fort Igatpuri Pudhari
रायगड

Tringalwadi Fort Igatpuri: इगतपुरीतील त्रिंगलवाडी दुर्गत्रयी : सह्याद्रीच्या कुशीतला ऐतिहासिक वारसा

त्रिंगलवाडी, कावनई आणि बळवंतगड किल्ल्यांचा इतिहास, जैन लेणी आणि सह्याद्रीचे मनोहारी दृश्य

पुढारी वृत्तसेवा

आटपाट नगर होतं

नीती मेहेंदळे

इगतपुरी हा मुंबई - नाशिक महामार्गावरचा हुकमी थांबा गणला जातो. इगतपुरी रेल्वे स्टेशनदेखील असल्यामुळे गिर्यारोहकांचं आवडतं ठिकाण झालं आहे. थंड हवेचं ठिकाण तर ते आहे. इथलं विपश्यना केंद्र ही इगतपुरीची ओळख ठरली आहे. पण, या रम्य इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरली आहे. त्यात बसवलेल्या त्याच्या बस्तानात तीन किल्ले लागोपाठ उंचावलेले दिसतात. या भागात डोंगरमाथ्यापर्यंत रस्ते बांधल्याने या प्रदेशात विकसित झालेली गावे आणि या प्रदेशातली रहदारी यांमुळे या रांगेतील हे किल्ले सहज गाठता येण्याजोगे झाले आहेत. इगतपुरीच्या मागच्या बाजूचा त्रिंगलवाडी आणि त्याच्या उजव्या बाजूचा कावनई असं दुर्गत्रिकूट बघायला मिळतं. ही सगळी मंडळी एकमेकांत इतकी बेमालूम मिसळली आहेत की, यातल्या प्रत्येकाच्या माहितीत इतर दोघांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो.

त्रिंगलवाडी म्हटलं तर कधी डाव्या बाजूच्या कसारा घाटाजवळच्या विहिगाव गावातून तर कधी इगतपुरीच्या प्रसिद्ध विपश्यना केंद्राच्या मागच्या बाजूच्या डोंगरातून किल्ल्यावर जायला वाटा आहेत. पण मळलेली वाट म्हणजे मात्र पायथ्याच्या तळ्याची वाडी गावातून आलेलीच. त्रिंगलवाडी ही निशाण वाडी, पत्र्याची वाडी आणि तळ्याची वाडी अशी मिळून बनलेली आहे- म्हणून त्रिंगलवाडी हे नाव आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे.

किल्ल्याला सर्वात जवळचा मार्ग तळ्याची वाडी गावातूनच जातो. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 3148 फूट आहे. दारणा नदीची उपनदी म्हणून मिरवणारी वाकी नदी त्रिंगलवाडी गावाजवळच्या ढोरीया डोंगरात उगम पावते. त्रिंगलवाडी गावाच्या मागचं त्रिंगलवाडी धरण याच नदीवर बांधलेलं आहे. धरणाच्या भिंतीवर चढून डावीकडे येऊन धरणाच्या भिंतीची संपूर्ण लांबी ओलांडल्यानंतर उजवीकडे एक रस्ता आपल्याला अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायथ्याशी नेतो.

इथे पायथ्याशी एक दोन जैन लेणी दिसतात. महाराष्ट्रात जैनांनी आठव्या शतकात लेण्या बांधण्यास सुरुवात केली. लेण्यांच्या बाहेर अनेक भग्न अवशेषांचा ढीग दिसतो. आयताकृती आकाराची ही लेणी

3 भागात विभागली आहेत. व्हरांडा, सभामंडप आणि गर्भगृह. व्हरांड्याच्या दोन्ही बाजूला चौकोनी आसनं आहेत, त्यांखाली तीर्थंकर आणि सेवकांची शिल्पे कोरलेली आहेत. कर्नाटकात बदामी गुंफांमध्ये अशीच रचना व्हरांड्यात छतावर दिसते. प्रशस्त सभामंडपात कोनाडे आहेत. आतील भिंतींमध्ये कोरीवकाम आहे. सभागृहाच्या छताला आधार देणाऱ्या 4 कोरीव खांबांपैकी 3 कोसळले आहेत आणि फक्त वरचा भाग शिल्लक आहे, ज्यांत पुन्हा यक्ष दिसतात. गर्भगृहाच्या आत, पहिले जैन तीर्थंकर, भगवान आदिदेव यांची कमळाच्या आसनात बसलेली एक पडझड झालेली मूर्ती आहे. तिच्या पायाशी देवनागरी लिपित आणि संस्कृत भाषेत एक महत्त्वाचा कालनिर्देशक शिलालेख आहे. या शिलालेखावरून त्रिंगलवाडी लेणी शक 1266 मध्ये खोदली होती असं समजतं. त्यावरून लेण्यांचा काळ इ.स. 1344 होता असा निष्कर्ष काढता येतो. या लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाके आहे. वरती डाव्या बाजूने किल्ल्याकडे जाण्यासाठी एक वाट आहे.

प्रथम आपण माचीवर पोहोचतो. इथून किल्ल्यापासून पसरलेली डोंगराची सोंड दिसते. उत्तर-दक्षिण पसरलेल्या या किल्ल्याला पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे 2 दरवाजे आहेत. पश्चिमेकडील दरवाजा म्हणजे कोकण दरवाजा. माचीवर उभं असताना कोकण दरवाज्याकडे जाण्याचा आणि दगडी पायऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माचीवरून डाव्या हाताचा मार्ग निवडावा लागतो. उजवीकडे कडा आणि डावीकडे दरी अशी अरुंद वाट पार करून प्रत्येकी सुमारे 1.5 फूट उंच 60 दगडी खोदलेल्या अंगावर येणाऱ्या खड्या पायऱ्या लागतात. त्या आपल्याला कोकण दरवाज्यात नेऊन सोडतात. उजव्या बाजूला वरच्या बाजूला, दक्षिणाभिमुखी दरवाजा आहे, जो खडकात कोरलेला आहे आणि समोरच्या भिंतीत 6 ते 7 फूट उंच हनुमानाची उभी मूर्ती आहे. प्रथम एका मोठ्या राजवाड्याचे अवशेष लागतात. वाड्यांचे अवशेष पाहून परत पायऱ्यांपासून उजवीकडे अनेक कोरड्या पाण्याच्या टाक्या आढळतात. पुढे गेल्यावर डावीकडे असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी एक

20-25 जणांना राहता येईल इतकी प्रशस्त गुहा आहे. येथून पुढे चालत गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे भुयारी टाके लागते. टाक्यांच्या खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळते. या टाक्यांपासून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागते. किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकावरील भवानी मंदिराची घुमटी आहे, ज्यात भवानी, गणेश, भैरव यांच्या शेंदूरात माखलेल्या मूर्ती आहेत. उत्तरेकडील बुरुजावरून, पूर्वेला कळसूबाई आणि उत्तरेला हरिहर, बसगड किल्ले दिसतात. बालेकिल्ल्यात कोणतेही अवशेष नाहीत परंतु तिथून संपूर्ण माचीचे दर्शन होते. किल्ल्याच्या शिखरावर तटबंदी विरळ आहे, परंतु येथून आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा, त्रिंगलवाडी जलाशय, दक्षिणेला इगतपुरी आणि वैतरणा खोरे, त्र्यंबक पर्वतरांगा, कावनई, मोरधन, अलंग आणि कुलंग किल्ले दिसतात.00000त्रिंगलवाडीच्या उजव्या बाजूला असलेल्या कावनई किल्ला हे निराळंच बेणं आहे. या गावाच्या संबंधी एक पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहे. लक्ष्मण राम-रावण युद्धात मूर्च्छित झाल्यावर औषध म्हणून सुचवलेली संजीवनी वनस्पती आणायला हनुमान इथे आला. इथल्या कावनई राक्षसाशी त्याने युद्ध केले व त्याला मारले. त्याच्या नावावरून गावाचं नाव म्हणे कावनई पडलं.

त्रिंगलवाडीच्या डावीकडे विहिगावचा बळवंतगड हा त्रिंगलवाडीच्या दुर्गत्रिकुटातला तिसरा किल्ला. हा किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश कसारा आणि इगतपुरी यांना जोडणाऱ्या थळ खिंड आणि जव्हार-त्र्यंबकेश्वर मार्गावर लक्ष ठेवणे हा होता. बळवंतगड हा मुख्य पर्वतरांगेपासून तुटलेल्या थळ खिंडीच्या विरुद्ध असलेल्या टेकडीवर आहे. कसारा घाटानंतर मुंबई-आग्रा महामार्गावर, थळ घाटावर खोडाळा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर विहिगाव नावाचे गाव आहे. येथून एक मार्ग आपल्याला माळ गावात घेऊन जातो. या मार्गावर एक छोटासा कच्चा रस्ता आहे. हा छोटासा मार्ग आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातो. किल्ला पूर्व-पश्चिम पसरला आहे. किल्ल्याच्या भिंतीपासून

पश्चिमेकडे गेल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी एक लहान उंचवठा आहे. उंच टेकाडावरून किल्ल्याचा उपयोग केवळ टेहळणी बुरुज म्हणून होत असावा, असं सिद्ध होतं. त्रिंगलवाडीची ही दुर्गत्रयी इगतपुरीचा प्राचीन वारसा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT