

महाड : श्रीकृष्ण द बाळ
अलीकडच्या काही वर्षांत वाढत्या उष्णतेमुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. तज्ञांच्या मते, जंगलांमध्ये लागणारे वणवे आणि वृक्षतोड यामुळे तापमान वाढण्याचा वेग अधिक वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण न ठेवल्यास तापमान 45 अंश से.च्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जंगलातील वणवे हे केवळ वनसंपत्तीचे नुकसान करत नाहीत, तर पर्यावरणातील संतुलनही बिघडवतात. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर आणि कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला जातो. त्यामुळे यांचा परिणाम अधिक तीव्र होतो. परिणामी पृथ्वीचे सरासरी तापमान वाढण्याची प्रक्रिया वेगाने घडते.वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडे जळून नष्ट होतात. झाडे ही वातावरणातील उष्णता कमी करण्यास आणि हवा शुद्ध ठेवण्यास मदत करतात. मात्र जंगलांचे क्षेत्र कमी झाल्याने नैसर्गिक थंडावा घटतो आणि जमिनीचे तापमान झपाट्याने वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होतात.
तापमानातील वाढीला रोखण्यासाठी वणवे रोखणे अत्यंत आवश्यक आहे. जंगलांमध्ये आग लागण्यामागे मानवी निष्काळजीपणाही मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो. जंगल परिसरात कचरा जाळणे, सिगारेटचे थोटूक फेकणे किंवा शेतातील अवशेष जाळणे यामुळे आग लागण्याची शक्यता वाढते. यासोबतच वनविभागाने अग्निरोधक उपाययोजना अधिक मजबूत करणे, जंगलात सतत गस्त ठेवणे आणि आग लागल्यास त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून हरितक्षेत्र वाढवणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, जर वणवे आणि वृक्षतोड यावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही, तर येत्या काही वर्षांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढू शकते. त्यामुळे तापमान 45 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणूनच पर्यावरण संरक्षण आणि वणवे रोखण्यासाठी शासन, वनविभाग आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे मत पर्यावरण प्रेमी व अभ्यासक यांच्याकडून व्यक्त होत आहे .