Shrivardhan Zilla Parishad Pudhari
रायगड

Shrivardhan Zilla Parishad: श्रीवर्धन पं.स.मध्ये सत्तास्थापनेचा ताळेबंद बदलला

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय; पंचायत समितीत समन्वयावर ठरणार सत्ता, उपसभापतीपद निर्णायक

पुढारी वृत्तसेवा

श्रीवर्धन : भारत चोगले

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाने श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक राजकारणाची दिशा बदलून टाकली आहे. गेल्या काही वर्षांपासून ज्या सत्तासमीकरणावर पंचायत समितीचा कारभार चालत होता, त्याला मतदारांनी स्पष्टपणे छेद दिला असून नव्या राजकीय गणितांना जन्म दिला आहे. आगामी काळात सत्ता कोणाच्या हातात राहणार, निर्णय प्रक्रिया कोण ठरवणार आणि सभापतीपदावर कोण विराजमान होणार, याबाबत चर्चा सुरू आहे.

आधीची सत्ता आणि आजचे चित्र मागील कार्यकाळात श्रीवर्धन तालुक्यात पंचायत समितीवर शिवसेना (धनुष्यबाण चिन्ह) यांचे वर्चस्व होते. त्यावेळी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे तीन सदस्य, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य निवडून आला होता. जिल्हा परिषदेतही एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना सदस्य असल्याने तालुक्याच्या सत्ताकेंद्रावर शिवसेनेचा प्रभाव अधिक होता. त्यामुळे सभापतीपद, समित्यांचे नेतृत्व आणि प्रशासकीय निर्णय हे मुख्यतः शिवसेनेच्या ताब्यात होते.

मात्र 2026 च्या निकालाने हे चित्र पूर्णतः बदलले आहे. आता जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवडून आले आहेत. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजपचा एक आणि शिवसेने (शिंदे गट) चा एक सदस्य निवडून आल्याने सत्ता संतुलनाचे नवे गणित तयार झाले आहे. स्पष्ट बहुमत कोणालाही नसले तरी, राजकीय पुढाकार मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याचे दिसून येते. संधी सर्वांना, पण अटींसह सध्याच्या रचनेनुसार पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि भाजपचा एक सदस्य असल्याने थेट सत्ता एकाच पक्षाच्या हाती जाणे शक्य नाही. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ कोणाकडेही एकहाती नसल्यामुळे सत्तेची चावी समन्वय, आघाडी आणि परस्पर सहमतीवर अवलंबून राहणार आहे. याच कारणामुळे ‌‘प्रत्येकाला एक-एक वर्ष संधी मिळण्याची शक्यता‌’ राजकीय वर्तुळात नाकारता येत नाही.

सध्या पंचायत समिती सभापतीपदासाठी मागासवर्ग आरक्षण लागू असल्याने किमान अडीच वर्षे उपसभापतीकडेच कारभाराची सूत्रे राहणार आहेत. ही बाब अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्यक्ष निर्णयक्षम सत्ता उपसभापतीकडे केंद्रित होणार आहे. त्यामुळे उपसभापती कोणत्या पक्षाचा असेल, यावरच विकासकामांची दिशा आणि निधीचे नियोजन अवलंबून राहील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य आणि भाजपचा एक सदस्य असल्याने, उपसभापतीपदावर राष्ट्रवादीचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे. मात्र भाजपचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो.

आगामी काळात जर सभापतीपदाचे आरक्षण रद्द झाले किंवा बदलले, तर खरा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या वेळी सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा की भाजपचा, हा प्रश्न निर्णायक ठरणार आहे. जिल्हा परिषदेत दोन्ही सदस्य राष्ट्रवादीचे असल्याने नैतिक व राजकीय दबाव राष्ट्रवादीच्या बाजूने राहील; परंतु पंचायत समितीतील संख्याबळ पाहता भाजपही आपली भूमिका ठामपणे मांडू शकतो.

या निवडणूक निकालातून श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विकासकामांना मिळालेली ही ‌‘मतदारांची पोचपावती‌’ असली, तरी पंचायत समितीतील सत्ता पूर्णतः एकहाती न राहता समन्वयावर चालणार आहे. त्यामुळे आगामी अडीच ते तीन वर्षे श्रीवर्धन तालुक्यातील राजकारण हे सौदेबाजी, समजूतदारपणा आणि कायद्याच्या चौकटीतील सत्तावाटप यावरच अवलंबून राहणार, हे निश्चित.

पंचायत समितीतील विजयी उमेदवार

दिघी - सचिन नंदाकर किर (राष्ट्रवादी काँग्रेस )

बोर्लिपंचतन - सुकुमार दत्तात्रेय तोंडलेकर (शिवसेना शिंदे गट)

आराठी - पूजा प्रशांत शिंदे (भाजप)

बागमांडला - अस्मिता प्रदर्शन चोरगे (राष्ट्रवादी काँग्रेस)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT