

अलिबाग ः सुवर्णा दिवेकर
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये अलिबाग तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या सात जागांपैकी सहा जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले असून उर्वरित एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमित नाईक यांनी पटकावली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत शेकापला एकही जिल्हा परिषद जागा मिळालेली नाही, तर भाजपचे कमळ अलिबाग तालुक्यात फुलू शकलेले नाही.
या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे थळ व चेंढरे गटातून सासूसुना एकाच वेळी विजयी होण्याचा ऐतिहासिक योग. थळ गटातून आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी तर चेंढरे गटातून त्यांची सुनबाई व अलिबाग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अदिती नाईक दळवी या निवडून आल्या आहेत.
शहापूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित अशोक नाईक यांनी 8,908 मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपचे माजी आमदार सुभाष पाटील ऊर्फ पंडित पाटील यांचे पुत्र सुप्रभात उर्फ सवाई पाटील, शिंदे गटाचे गिरीश पाटील तसेच शेकापचे अभिषेक पाटील यांचा पराभव केला. विशेष म्हणजे सवाई पाटील यांना अवघी 2,547 मते मिळाल्याने ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले असून हा पराभव पंडित पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आवास गटातून शिवसेना शिंदे गटाचे दिलीप विठ्ठल भोईर यांनी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र राजेंद्र ठाकूर यांचा 2,372 मतांनी पराभव केला. दिलीप भोईर यांना 11,933 तर राजेंद्र ठाकूर यांना 9,531 मते मिळाली. दिलीप भोईर हे तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. आंबेपूर गटातून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या पत्नी रसिका केणी यांनी भाजपच्या महिला आघाडी अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सभापती चित्रा पाटील यांचा तब्बल 4,515 मतांनी पराभव केला. चित्रा पाटील यांना 7,459 मते मिळाली, तर शेकापच्या पूजा भगत यांना 4,785 मते मिळाली. चौल गटातून शिवसेना शिंदे गटाचे सचिन राऊळ यांनी 10,223 मते घेत उबाठाचे जिल्हाप्रमुख व माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांचा 3,767 मतांनी पराभव केला. भाजपचे उमेदवार संकेत जोशी यांना केवळ 1,538 मते मिळाली. कावीर गटात शिवसेना शिंदे गटाचे अनंत गोंधळी यांनी शेकापचे मोहन धुमाळ यांचा केवळ 154 मतांनी पराभव करत अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. थळ गटातून मानसी दळवी यांनी शेकापच्या सानिका घरत यांचा 6,459 मतांनी पराभव केला. मानसी दळवी यांना 14,328 मते मिळाली असून त्या चौथ्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपच्या जान्हवी पारेख यांना अवघी 775 मते मिळाली. चेंढरे गटातून अदिती नाईक दळवी यांनी शेकापच्या प्रवीण घासे यांचा 5,055 मतांनी पराभव केला. पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले असून 14 पैकी 12 जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप व शेकापला प्रत्येकी केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. एकूणच अलिबाग तालुक्यातील निकालांनी शेकाप पूर्णतः भुईसपाट झाल्याचे, तर भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले असून शिवसेना शिंदे गटाने आपली राजकीय ताकद ठामपणे सिद्ध केली आहे.
रायगडात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी
जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर होताच संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांची कार्यालये, प्रमुख चौक, मुख्य रस्ते व वस्त्यांमध्ये विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून, गुलाल उधळून आणि ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत विजयाचा आनंद व्यक्त केला.
निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जंगी तयारी करण्यात आली होती. फुलांच्या हारांनी, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजीच्या गजरात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. पक्षीय झेंडे, बॅनर आणि फलकांनी संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच जल्लोष करत वाहतुकीचा वेग मंदावला, मात्र पोलिस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात होती.
विजयानंतर पक्षीय कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. पेढे, लाडू, बुंदी, जिलेबी आदी मिठाईचे वाटप करण्यात आले. अनेक ठिकाणी चहा-पाण्याची तसेच अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तरुणांनी ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत जल्लोष साजरा केला. महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत पारंपरिक पद्धतीने औक्षण करून आनंद व्यक्त केला.
अनेक भागांत विजय चौक सभा घेण्यात आल्या. या सभांमध्ये विजयी उमेदवारांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी विकासकामांना प्राधान्य दिले जाईल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कामकाज केले जाईल,” असे आश्वासन उमेदवारांनी दिले. तसेच विरोधी उमेदवारांनाही त्यांनी सहकार्याचे आवाहन केले.