Raigad Shiv Jayanti Celebration Pudhari
रायगड

Raigad Shiv Jayanti Celebration: रायगडमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; 238 ठिकाणी पूजन, 89 भव्य मिरवणुका

600 हून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; अलिबागमध्ये ‘प्रतापगड पर्व’ सांस्कृतिक सोहळ्याची रंगत

पुढारी वृत्तसेवा

रायगड : शिवजयंतीचा उत्साह संपूर्ण रायगड जिल्ह्यात शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यासाठी शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रायगड पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, संपूर्ण जिल्ह्यात 600 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यंदा रायगड जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रायगड जिल्हा पोलस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सुमारे 238 ठिकाणी सार्वजनिकरीत्या शिवरायांच्या पुतळ्यांचे किंवा प्रतिमांचे पूजन केले जाणार आहे. शिवजयंतीचे मुख्य आकर्षण असलेल्या भव्य मिरवणुकांची संख्या 89 इतकी आहे. यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपारिक वेशभूषेत शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. या शिवाय व्याख्याने, पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह इतर 13 उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सुरक्षेसाठी पोलीस दलाची फौज तैनात

मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या मिरवणुका आणि गर्दी विचारात घेता, रायगड पोलिसांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्ह्यात बंदोबस्तासाठी 76 पोलीस अधिकारी, 488 पोलीस अंमलदार, 68वाहतूक पोलीस अंमलदार तर आरसीपीच्या 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मिरवणुकीच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी 68 वाहतूक पोलीस विशेष तैनात करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील संवेदनशील भागांत विशेष गस्त वाढवण्यात आली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जात आहे. पोलीस प्रशासनाने सर्व शिवप्रेमींना आणि मंडळांना आवाहन केले आहे की, त्यांनी उत्सवाचा आनंद घेताना नियमांचे पालन करावे, ध्वनी प्रदूषणाबाबतच्या मर्यादा पाळाव्यात आणि पोलिसांना सहकार्य करावे.एकूणच, रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा आणि शिवरायांप्रती असलेली भक्ती पाहता, हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे.सर्वत्र उत्साहही जाणवत आहे.

अलिबागमध्ये शिवजयंतीनिमित्त आज प्रतापगड पर्व कार्यक्रम

रायगड : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून अलिबागमध्ये एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गाज फाउंडेशन आणि मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.45 वाजता हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक, अलिबाग येथे पार पडणार आहे. प्रतापगड पर्व या कार्यक्रमाद्वारे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आणि त्यांच्या जीवनातील स्फूर्तिदायक क्षण प्रेक्षकांसमोर मांडले जाणार आहेत. राजमाता जिजाऊंच्या संस्कारातून घडलेल्या शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे निमंत्रक म्हणून रघुजीराजे आंग्रे (अध्यक्ष, गाज फाउंडेशन) आणि ॲड. मानसी संतोष म्हात्रे (अध्यक्षा, मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्ट, अलिबाग) यांनी शिवप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT