Ladvali Bridge
लाडवली येथील पूल निर्मितीचा प्रश्न गंभीर झाला आहे.  Pudhari News Network
रायगड

रायगड : लाडवली पुलाचे काम रेंगाळले; ३० तासांपासून मार्गावर पाणी

पुढारी वृत्तसेवा
इलियास ढोकले

नाते : मागील तीन वर्षापासून सातत्याने चर्चेत राहिलेल्या किल्ले रायगड मार्गावरील राष्ट्रीय मार्गाच्या कामात ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या विलंबामुळे लाडवली येथील पूल निर्मितीचा प्रश्न गंभीर झाला आहे. या मार्गावर मागील 30 तासांपासून पाणी आल्याने व पुलाची निर्मिती अर्धवट झाल्याने या परिसरातील 5 हजार लोकांचा संपर्क महाड शहराशी तुटला आहे. दरम्यान, शासनाने निर्माण केलेला पर्यायी मार्ग मनस्ताप देणारा असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.

तत्कालीन ठेकेदाराचे निकृष्ट दर्जाचे काम

मागील तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तत्कालीन ठेकेदाराचे निकृष्ट दर्जाचे काम असल्याच्या तक्रारी रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्यानंतर त्या ठेकेदाराला दिलेले काम रद्द करून नव्याने निविदा प्रसिद्ध करून अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीला या रस्त्याचा काम करण्याची परवानगी देण्यात आली. या ठेकेदारामार्फत कामाच्या सुरुवातीपासूनच स्थानिक नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत होत्या. चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच परिसरातील नागरिकांनी मार्गावरील असलेले छोटे पूल हे मे महिन्यापूर्वी पूर्ण करावेत, असा आग्रह राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदाराच्या एजन्सीकडे केला होता.

तीन महिन्यात संथ गतीने काम केल्याने प्रश्न गंभीर

मात्र या ठेकेदाराने मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात अत्यंत संथ गतीने काम केल्यानेच आजची ही दारुण परिस्थिती रायगड विभागातील जनतेला भोगावी लागत आहे. यासाठी संबंधित ठेकेदार जबाबदार असून त्याच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत शासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

मुख्य मार्गावरून संपर्क महाड शहराशी तुटला

गुरुवार दुपारी तीन वाजल्यापासून या मार्गावर रायगड विभागात झालेल्या मुसळधार पावसाने पाणी आले असून किल्ले रायगड विभागात जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने नागरिकांचा या मुख्य मार्गावरून संपर्क महाड शहराशी तुटला आहे. या जागेपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर मोहोप्रे - आचळोली गावामार्फत पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन स्थानिक प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून यापूर्वी करण्यात आले होते.

15 जुलैपूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन

मात्र, लाडवली येथून मांडले मार्गाकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी तसेच किल्ले रायगड कडील असणाऱ्या विविध गावात जाण्यासाठी हा पर्यायी मार्ग अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी हा रस्ता नादुरुस्त असून मोठ्या गाड्या या ठिकाणी आल्यास वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार आहे यामुळे हा पर्यायी मार्ग नागरिकांनी प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये नामंजूर करून संबंधित ठेकेदाराला तातडीने पुलाचे काम पूर्ण करण्याबाबतचा आग्रह धरला होता. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने 15 जुलै पूर्वी या मार्गावरील पुलाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले होते.

ठेकेदाराकडून निष्काळजीपणा व जाणीवपूर्वक विलंब

मात्र, मागील चार दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आगामी चार दिवसांपर्यंत राहिल्यास या परिसरातील नागरिकांचा संपर्क महाड शहराशी होऊ शकणार नाही. एकूणच संबंधित ठेकेदाराकडून निष्काळजी व जाणीवपूर्वक विलंब केल्याने या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरोधात राष्ट्रीय महामार्ग विभाग व स्थानिक प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

SCROLL FOR NEXT