चोरी करणाऱ्या चार आरोपींना अवघ्या ४८ तासांत जेरबंद करण्यात खोपोली पोलिसांना यश  Pudhari
रायगड

Khopoli Temple Theft | विरेश्वर मंदिरातील चोरीप्रकरणी चार जणांना ४८ तासांत अटक

खोपोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मुद्देमाल जप्त, आणखी आरोपींचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

Khopoli Vireshwar Temple Theft

खोपोली : खोपोली शहराचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक विरेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीवरील सुमारे १७ किलो वजनाचे चांदीचे आच्छादन चोरी करणाऱ्या चार आरोपींना अवघ्या ४८ तासांत जेरबंद करण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला असून, पोलिसांच्या तत्पर आणि नियोजनबद्ध तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रकरणी अमोल सुरेश कसबे, विलास साहेबराव आगीवले (रा. शिरूर, जि. पुणे), तसेच दिलीप राजू जाधव आणि सखाराम छबन गायकवाड (रा. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

खोपोलीतील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन विरेश्वर मंदिरात रविवारी (दि. १९ जुलै) पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली होती. चोरट्यांनी महादेवाच्या पिंडीवरील सुमारे १७ किलो वजनाचे चांदीचे आच्छादन लंपास केले होते. या घटनेमुळे खोपोली शहरात संतापाची लाट उसळली होती.

चोरीची संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. मात्र, मंदिराबाहेरील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे आरोपी कोणत्या दिशेने पसार झाले, याचा माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल पाटील आणि खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली तपासाची सूत्रे वेगाने हलविण्यात आली.

या प्रकरणाच्या तपासासाठी खोपोली पोलिसांची तीन, खालापूरची एक, रसायनीची एक तसेच अलिबाग स्थानिक गुन्हे शाखेची पथके अशा एकूण आठ तपास पथकांची स्थापना करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींनी मंदिरातून बाहेर पडण्यासाठी वापरलेल्या संभाव्य मार्गांचे प्रात्यक्षिक करून विविध तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज आणि फास्टॅग प्रणालीच्या मदतीने आरोपींचे वाहन कर्जतच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी शिरूर (पुणे) आणि पारनेर (अहिल्यानगर) येथून चारही आरोपींना अटक केली.

आरोपींकडून चोरीतील चांदीचे आच्छादन आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यामागे आणखी काही जणांचा सहभाग आहे का, चोरीपूर्वी रेकी करण्यात आली होती का आणि चोरीतील मालाची विल्हेवाट लावण्याचा कट होता का, याचा तपास सुरू आहे.

अवघ्या दोन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात यश आल्याने खोपोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT