रायगड : रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे योजनेवर हजारो कोटी रुपयांचा खर्च करूनही जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 253 गावे व वाड्यांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यात समावेश करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी 9 कोटी 30 लाख 50 हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करुन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडूनही योग्य नियोजनाअभावी रायगड जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील नद्यांवर पुरेशी धरणे नसल्याने पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून टंचाई निवारण आराखडा तयार करुन, उपाययोजना करण्यात येतात. त्यानुसार टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येते, मात्र हे नियोजन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुरेशे नसल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणारी गावे आणि वाड्यांमध्ये 467 गावे आणि 786 वाड्यांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये 774 गावे आणि वाड्यांमध्ये टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी 3 कोटी 49 लाख 4 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. 100 नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी 2 कोटी 74 लाख 84 हजार, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी 39 लाख 47 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 174 विहिरींमधील गाळ काढण्याबरोबरच त्यांची खोली वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी संभाव्य टंचाई कृती आराखड्यामध्ये 1 कोटी 72 लाख 79 हजारांचा खर्च अपेक्षित धरला आहे. तसेच 102 नवीन विंधन विहिरींसाठी 94 लाख 25 हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत हर घर नल से जल या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. मात्र रायगड जिल्ह्यात या योजनेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. योजनेंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 422 योजनांची कामे हाती घेण्यात आली असून, ही कामे डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. विहित मुदतीत कामे पूर्ण न झाल्याने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.
जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणारी गावे आणि वाड्यांमध्ये 467 गावे आणि 786 वाड्यांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये 774 गावे आणि वाड्यांमध्ये टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी 3 कोटी 49 लाख 4 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. जिल्ह्यातील 100 नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी 2 कोटी 74 लाख 84 हजार रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.