सावित्री, आंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलंडली Pudhari
रायगड

Raigad Rain | रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; नद्या धोक्याच्या पातळीवर, जनजीवन विस्कळीत

लहान-मोठ्या नद्यांनाही पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

पुढारी वृत्तसेवा

Raigad Flood Alert

सुवर्णा दिवेकर

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. ६) मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजविला. सावित्री, आंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड, रोहा, नागोठणे, खालापूरसह अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पुराचे पाणी शिरले. जिल्ह्यातील इतर लहान-मोठ्या नद्यांनाही पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, पुराच्या पाण्याने गावांना वेढा घातला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच ताम्हिणी घाटात दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे अशा घटनांमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. अनेक वाहनचालक तासन्तास महामार्गांवर अडकून पडले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागांतील हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.Raigad Rain

सोमवारी सकाळी १०.२० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २३६.६ मिमी पावसाची नोंद झाली. प्रादेशिक हवामान विभागाने मंगळवारीही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवल्या आहेत.

सलग सहाव्या दिवशी कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे नसल्याने दरडप्रवण आणि पूरग्रस्त गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शोध व बचाव पथके, रुग्णवाहिका, आवश्यक साहित्य आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

महामार्गांवरील वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक अनेक तास ठप्प झाली. पाण्याचा निचरा होईपर्यंत या मार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्यानेही महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सोमवारी पहाटे दोन क्रमांकाच्या बोगद्याजवळ दरड कोसळून दगड-मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी मार्गिका तातडीने बंद करण्यात आली. महामार्ग प्राधिकरणाच्या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत दरड हटविण्याचे काम सुरू केले. दरम्यान, खालापूरजवळील फूड मॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने द्रुतगती मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

घाटमार्गही बंद

अतिवृष्टीमुळे ताम्हिणी घाटातील मुळशी हद्दीत शंकर मंदिराजवळ सुमारे ३०० मीटर अंतरावरील रस्ता खचल्याने पुणे-कोलाड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच वरंधा घाटात दरड कोसळल्याने महाड-पुणे मार्ग बंद झाला असून, पोलादपूर-महाबळेश्वर मार्गही दरडींच्या धोक्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे तीन प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.

रेल्वे सेवेलाही फटका

पळसदरी-खोपोली रेल्वेमार्गाचा काही भाग खचल्याने या मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली. पळसदरी-ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळून दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने मातीखाली गाडली गेली.

स्थलांतराला वेग

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून ठिकठिकाणी दरडी कोसळत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी सायंकाळपर्यंत १४ गावांतील २६५ कुटुंबांमधील ९३७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.

२५ ठिकाणी दरडी, तिघे जखमी

जिल्ह्यात २५ ठिकाणी दगड-माती कोसळण्याच्या तर ७३ घरांच्या परिसरात दरडी कोसळल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. या घटनांमध्ये तीन जण जखमी झाले असून, रस्त्यांवरील माती व दगड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.

घरांचे, पशुधनाचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

अतिवृष्टीमुळे तीन मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला असून त्यात कर्जतमधील एक बैल, माणगावमधील एक गाय आणि पेणमधील एका गायीचा समावेश आहे. तसेच ८६ कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार ८४ घरांची पडझड झाली असून २४२ घरांमध्ये पाणी शिरले आहे. सात गोठ्यांचे नुकसान झाले असून रोहा तालुक्यातील बाळसई येथील मंदिर, महाड तालुक्यातील विन्हेरे सुतारकोंड येथील शाळा तसेच १२ खासगी दुकानांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

बल्लाळेश्वर मंदिरात शिरले पाणी

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरात रविवारी रात्री सुमारे ८.१० वाजता चिखलयुक्त पुराचे पाणी शिरले. मंदिराच्या पूर्वेकडील ओढा ढगफुटीसदृश पावसामुळे ओसंडून वाहू लागल्याने ही घटना घडली. देवस्थान कर्मचारी आणि स्थानिक दुकानदारांनी अवघ्या ३० ते ४० मिनिटांत मंदिरातील पाणी बाहेर काढून परिसर स्वच्छ केला. त्यामुळे मंदिर भाविकांसाठी तातडीने पुन्हा खुले करण्यात आले.

गणेशमूर्ती उद्योगाला मोठा फटका

पेण तालुक्यातील भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे तांबडशेतसह परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले. पुराचे पाणी गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये घुसल्याने तयार होत असलेल्या कच्च्या गणेशमूर्ती पाण्यात भिजल्या. गणेशोत्सव अवघ्या सव्वादोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना कारखानदारांसमोर पुन्हा मूर्ती तयार करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

तालुकानिहाय पावसाची नोंद (मिमी)

सोमवारी सकाळी १०.२० वाजेपर्यंत अलिबाग २१३.३, पनवेल २३३.३, कर्जत २३२, खालापूर ३२३.३, उरण २२४.३, सुधागड २६८.२, पेण २०३.५, महाड २७२.२, माणगाव २१८, रोहा २३६.९, पोलादपूर २४४, मुरूड १७८.५, श्रीवर्धन १८७.८, म्हसळा २१५ आणि तळा २३५.८ मिमी पावसाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT