पनवेल
विक्रम बाबर : कॉल सेंटरच्या माध्यमातून विविध फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याची बतावणी करून सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाइन कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या आंतरराज्यीय फसवणूक टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
करंजाडे येथील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या या बनावट कॉलसेंटरवर छापा टाकून पोलिसांनी चार आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, १५ मोबाईल फोन, ३१ सिमकार्ड, विविध बँकांची डेबिट कार्डे आणि रोख रकमेसह तब्बल ३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील करंजाडे परिसरात काही व्यक्ती भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून बनावट कॉलसेंटर चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या कॉलसेंटरमधून आरोपी स्वतःची खरी ओळख लपवून सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क साधत होते. त्यानंतर धनी फायनान्स तसेच इतर नामांकित फायनान्स कंपन्यांमधून बोलत असल्याची बतावणी करून नागरिकांना कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले जात होते.
कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली आरोपी नागरिकांकडून प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स, होल्डिंग चार्ज, जीएसटी चार्ज आदी विविध खोटी कारणे सांगून पैसे उकळत होते. नागरिकांना वेगवेगळे क्यूआर कोड किंवा स्कॅनर पाठवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले जात असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन फसवणूक सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई सायबर पोलीस ठाणे आणि कळंबोली पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास करंजाडे येथील नीलगिरी अपार्टमेंट, रूम क्रमांक ४०१, सेक्टर आर-४ येथे छापा टाकला. या कारवाईत विजय बाबू भंडारी (३६), तुषार अरुण पिंगळे (३४), रोहित रंगाप्पा गौडा (२१) आणि दर्शन उमाशंकर (२१) या चौघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. यातील रोहित गौडा आणि दर्शन उमाशंकर हे कर्नाटकातील रायचूर येथील रहिवासी असल्याने या फसवणूक रॅकेटचे आंतरराज्यीय नेटवर्क असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली असता या ऑनलाइन फसवणुकीसाठी वापरले जाणारे तीन लॅपटॉप, १५ मोबाईल फोन, विविध व्यक्तींच्या नावावरील सात वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, ३१ सिमकार्ड, ७४ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम, हिशोबाच्या दोन वह्या, एक डायरी, वायफाय राउटर आणि नेटवर्क टर्मिनल डिव्हाइस असा एकूण ३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मोबाईल, सिमकार्ड आणि बँक खात्यांच्या आधारे आरोपींनी आतापर्यंत किती नागरिकांची फसवणूक केली, किती रकमेचे व्यवहार झाले आणि या टोळीचे आणखी साथीदार आहेत का, याचा तपास सुरू आहे. आरोपींचे बँक खाते आणि डिजिटल व्यवहार तपासून देशातील इतर भागांतील फसवणुकीच्या प्रकरणांशी या टोळीचा संबंध आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ रश्मी नांदेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग मथुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक शाकीर पटेल (गुन्हे), पोलीस निरीक्षक अभिजीत अभंग (प्रशासन)
पनवेल शहर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित बिरादार , पोलीस हवालदार धीरज थवई , पोलीस शिपाई विदयाधर गायकवाड , अजय पाटील , साधना पवार , सायबर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक अभय कदम , कळंबोली पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक अभय काळे , यांनी केली आहे .यांच्यासह पनवेल शहर पोलीस, सायबर पोलीस आणि कळंबोली पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
फसवणुकीच्या डिजिटल जाळ्यावर मोठा प्रहार
कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीने बनावट ओळख आणि तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणुकीचे जाळे उभारल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केल्याने या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि इतर साथीदारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता तपास यंत्रणेसमोर आहे.