

मुंबई: लोन ॲपच्या माध्यमातून खंडणी वसुलीचा धक्कादायक प्रकार अंधेरीत उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेने सहा जणांच्या टोळीला अटक केली असून त्यांनी एकाला सात लाख रुपयांचे कर्ज घेण्यास प्रवृत्त करून 512 टक्क्यांनी व्याज लावून त्यांच्याकडून साडेसतरा लाख रुपये वसुल केले आहेत.
सुदेश चंद्रकांत वाघरे, पवेश नारायण गोरीवले, प्रविण पांडुरंग जाधव, प्रविण सुखदेव थोरात, रवी मदनलाल जैस्वाल आणि वाल्मिकी गेनालाल गुप्ता अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर त्यांना किल्ला न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यातील तक्रारदार अंधेरी येथे राहत असून एका बँकेत कामाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका ऑनलाईन लोन ॲपवरून 22 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची व्याजासहीत परतफेड केली होती. कर्ज घेताना त्यांच्या एपीके फाईलद्वारे आरोपींनी त्यांची माहिती घेतली होती.आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या अठराहून अधिक लोन ॲपवरुन आणखी सात लाख रुपयांचे कर्ज घेण्यास प्रवृत्त केले होते.
या कर्जासाठी त्यांनी 512 टक्क्यांनी व्याज लावून त्यांच्याकडून साडेसतरा लाख रुपये वसुल केले होते. तरीही ते त्यांना सतत धमकी देत होते. कुटुंबीयांना जीवे मारण्याची तसेच त्यांच्या मुलीवर ॲसिड हल्ल्याचीही धमकी देत होते.
काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या बँकेजवळ त्यांना बेदम मारहाण केली होती. या शोषणाला कंत्राटदार कंटाळून गेले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार एमआयडीसी पोलिसांना सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
हा तपास हाती येताच प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक जयेश कुलकर्णी, रामेश्वर घाटोळ, नितीन भोसले, विजय भेंडाळे, अंकुश न्यायनिर्गूणे, सहाय्यक फौजदार मंगेश सावंत, पोलीस हवालदार राणे, परब, पाडवी, मोटे, लोहकारे, काळे, बोरसे, थिटमे, डेरे, हरड, पोलीस शिपाई शिंदे, आव्हाड, कळसाने, शिंदे यांनी वेगवेगळ्या परिसरातून सहाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेत अटक केली आहे.
अनेकांना गंडा घातल्याची शक्यता
चौकशीत अशाप्रकारे ऑनलाईन लोन ॲपवरून अनेकांना कर्ज देऊन त्यांच्याकडून या आरोपींनी मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली केली आहे. त्यासाठी त्यांचे मानसिक शोषण केले जात होते. या कटातील मुख्य आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी सांगितले.