

कोल्हापूर : महालक्ष्मी को-ऑप. बँकेत एका वाहन कर्जदाराच्या खात्यावर परस्पर १ कोटी १० लाख रुपयांचे कर्ज उचल झाल्याच्या प्रकाराची पोलखोल शिवसेना शहरप्रमुख विशाल देवकुळे यांनी केली आहे. बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचा आरोप देवकुळे यांनी केला.
बँकेच्या गोकुळ शिरगाव येथील शाखेतून विशाल जाधव यांनी ४ लाखांचे वाहन कर्ज घेतले होते. यापैकी २ लाखांच्या कर्जाची त्यांनी परतफेड केली होती तर उर्वरित दोन लाखांच्या कर्ज वसुलीसाठी बँकेने जाधव यांच्याकडे तगादा लावला होता. बँकेच्या तगाद्याला वैतागून जाधव यांनी फायनान्स कंपनीतून कर्ज घेऊन बँकेचे कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जाधव फायनान्स कंपनीत गेले यावेळी त्यांचा सिबिल रिपोर्ट तपासला असता जाधव यांच्या नावावर महालक्ष्मी बँकेचे १.१० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे देवकुळे यांनी सांगितले.
याबाबत बँकेकडे विचारणा केली असता शाखेतील अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील मुख्य शाखेत गेल्यावर येथील अधिकार्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकारणाची चर्चा करुन सात दिवसांत नेमका काय प्रकार घडला आहे, याची माहिती देतो, असे सांगितले असल्याचे देवकुळे यांनी सांगितले.
जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करणार
संचालक मंडळाच्या संमतीशिवाय १ कोटी १० लाख रुपयांचे कर्ज दिलेच कसे असा प्रश्न आहे. त्यामुळे याप्रकरणाबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करणार आहे. तसेच संचालक मंडळाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे देवकुळे यांनी सांगितले.
फसवणुकीचे आणखी प्रकार
बँकेकडून विविध प्रकारे फसवणूक झाल्याच्या आणखी २० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकारांचीही माहिती घेऊन बँकेविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देवकुळे यांनी दिला आहे.