रायगड

Raigad accident | पोलादपूर महाबळेश्वर मार्गवर स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळली, 8 पर्यटक ठार

दांभिल टोकजवळ रात्रीच्या वेळेस हा भीषण अपघात झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

Mahabaleshwar highway accident latest updates

पोलादपूर : रायगड जिल्ह्याच्या आंबेनळी घाटात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन थेट ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीतील सर्व ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे सर्व मृत पर्यटक सातारा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं सांगण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात हा अपघात घडला. वीकेंड संपवून परतत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घाटातील तीव्र वळणावर स्कॉर्पिओ गाडी थेट खोल दरीत कोसळली. रात्रीचा अंधार आणि घाटातील अतिशय दुर्गम भाग यामुळे प्रशासनाला अपघाताची माहिती मिळण्यास काहीसा उशीर झाला.

या मोहिमेत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सद्याद्री ट्रेकर्स तसेच महाड येथील सिस्केप रेस्क्यू टीम यांचा सक्रिय सहभाग असून, शनिवारी रात्री सुमारे 10 वाजल्यापासून बचावकार्य अखंड सुरू आहे. रात्रभर दोरांच्या सहाय्याने दरीत उतरून वाहनापर्यंत पोहोचण्याचा आणि अडकलेल्या प्रवाशांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अंधार, खोल दरी आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) शंकर काळे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. विविध विभागांमध्ये समन्वय साधून शोधमोहीम अधिक वेगाने राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

सोमवारी सकाळीही शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आले असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक, नातेवाईक आणि स्थानिक प्रशासन उपस्थित आहे. वाहनापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांकडून विशेष तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. अपघातग्रस्त वाहन दरीच्या अत्यंत खोल भागात असल्याने बचावकार्यात मोठी कसरत करावी लागत आहे.

या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाबळेश्वर, पोलादपूर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35) यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

२०१८ च्या महाभयंकर बस दुर्घटनेची आठवण ताजी

ज्या परिसरात हा अपघात घडला आहे, त्याच ठिकाणी २०१८ मध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत ३० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा त्याच परिसरात हा स्कॉर्पिओ जीपचा अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT