Sindhudurg Accident : महामार्गावर कुत्रा आडवा आल्याने कारवरील नियंत्रण सुटले; अपघातात महिलेचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव-ओटव फाटा येथील बॉक्सवेल उड्डाणपुलावर कारचा भीषण अपघात
Mumbai Goa Highway Car Accident
Mumbai Goa Highway Car AccidentPudhari
Published on
Updated on

Mumbai Goa Highway Car Accident

नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव-ओटव फाटा येथील बॉक्सवेल उड्डाणपुलावर शुक्रवारी (दि.८) रात्री सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कारसमोर अचानक कुत्रा आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावरील संरक्षक कठड्यावर आदळून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन कोसळली.

या अपघातात कारमधील मागील सीटवर बसलेल्या मीरा सचिन सावंत (वय ४७, रा. विक्रोळी, मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक सचिन भास्कर सावंत (वय ५०) आणि त्यांची पुतणी सानिका समीर सावंत (वय २४, रा. वसई) हे गंभीर जखमी झाले.

Mumbai Goa Highway Car Accident
Sindhudurg Accident | दुचाकीवरुन घसरुन झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्‍यू

सावंत कुटुंबीय मुंबईहून आपल्या मूळ गावी हिर्लोक-वेताळ बांबर्डे येथे होम-हवन कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी नांदगाव-ओटव फाटा येथील ब्रॉक्सलेव पुलावर त्यांच्या कारसमोर अचानक कुत्रा आल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर वाहनाची पुढील चाके रस्त्यावर तर मागील चाके पुलाच्या संरक्षक कठड्यावर अडकलेल्या अवस्थेत होती. मीरा सावंत यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai Goa Highway Car Accident
Sindhudurg Accident : वडिलांच्या गाडीचा धक्का बसून चिमुकलीचा मृत्यू

दरम्यान, पुढील सीटवर बसलेली सानिका सावंत ही कारमध्ये अडकून पडली होती. स्थानिक नागरिकांनी तिला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. अखेर कारच्या पुढील भागाला दोरी बांधून ट्रकच्या सहाय्याने वाहन ओढण्यात आले आणि तब्बल दीड तासांच्या प्रयत्नानंतर तिला बाहेर काढण्यात यश आले. सानिका हिच्या पायाला व छातीला गंभीर दुखापत झाली असून चालक सचिन सावंत हेही गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र, वारंवार माहिती देऊनही पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

जखमी आणि मृत महिलेचा मृतदेह नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिका तसेच १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आणण्यात आला. प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले.

Mumbai Goa Highway Car Accident
Sindhudurg Accident : दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार घुसली दुकानात

या मदतकार्यात पोलीस पाटील वृषाली मोरजकर, पंढरी वायंगणकर, सरपंच रविराज मोरजकर, केदार खोत, पांडू तेली, मंगेश बोभाटे, म्हाडेश्वर बंधू, भूषण म्हसकर, अनिल नरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि वाहनचालक सहभागी झाले होते.

दरम्यान, पंढरी वायंगणकर यांनी जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी सावंत कुटुंबीयांना याबाबत कळवले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवार नांदगाव येथे दाखल झाले.

कणकवली पोलीस ठाण्याचे पांडुरंग पांढरे आणि पन्हाळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून या अपघाताचा पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news