Power supply disrupted after tree falls on power lines at Phanskond
पोलादपूर : धनराज गोपाळ
काल (सोमवार) दुपारी झालेल्या वादळी पावसात तालुक्यातील कोंढवी विभागातील फणसकोंड बागवाडी जवळ विद्युत वाहक तारेवर झाड पडले. त्यामुळे कोंढवी व पळचिल विभागातील नागरिकांना सुमारे २० तास अंधाराचा सामना करावा लागला. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सोमवार रोजी दुपारी दोन वाजता वादळी पावसात विद्युत तारेवर झाड कोसळून पडले. यावेळी १ पोल जमीनदोस्त झाल्याने या विभागातील अनेक गावे, वाड्या अंधारात आहेत.
या विभागासाठी महावितरणकडून स्वतंत्र टेक्निशियन नसल्याने कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतली जात आहेत. त्यामुळे वीज जोडणीच्या कामात व्यत्यय येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महावितरणकडून पावसाळापूर्वी कामे करताना नेहमीच दिरंगाई होत असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने त्याचा फटका आम्हाला नागरिकांना सहन करावा लागत असल्याचेही ग्रामस्थांकडून सांगितले जाते.
दरम्यान भोगाव हद्दीत जुन्या महामार्गावर रस्त्याला भेगा पडल्याने या ठिकाणी असणारा विद्युत पोल क्रॉस होऊन वाकल्याने कशेडी बंगला, पळचील विभागाचा वीजपुरवठा खंडित करून तो कोंढवी मार्गे वळवून या विभागाला वीजपुरवठा केला जातो. मात्र महामार्गावरील पोलची तात्काळ दुरुस्ती करून पूर्वीप्रमाणेच विद्युत पुरवठा सुरू करावा अशी मागणी कशेडी बंगला विभागातील नागरिकांकडून केली जात आहे.
विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी वारंवार महावितरणकडे मागणी करून देखील अधिकारी वर्गाकडून दुर्लक्ष केले जाते. याबाबत पोलादपूर तहसीलदार यांनाही कळविण्यात आले असून, महावितरणकडून पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत चालू राहिला नाही तर आम्ही कोंडवी विभागातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी सरपंच सुहास मोरे यांनी दिला आहे.