

मालवण (रायगड): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट मध्ये विक्रमी वेळात छत्रपती शिवरायांचा हा पुतळा उभा राहिला आहे. त्याची भव्यता अजून अधोरेखीत कण्यासाठी इथे आजूबाजूचा परिसर सुशोभीत करण्याचा, शिवसृष्टी उभारण्याच काम लवकर सुरू होईल,अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच रविवार (दि.11) आजरोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेऊन पूजन केलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे,खा.नारायण राणे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार रविद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे , जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत शिव आरती झाल्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली.
यावेळी ना. फडणवीस म्हणाले की, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे या ठिकाणच्या भागाला पर्यटन दृष्ट्या अजून महत्व येईल.
गेल्या वर्षी २६ ऑगस्टला इथला पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर सहा महिन्यात जगाला हेवा वाटेल असा पुतळा उभारण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, त्याप्रमाणे ३१ कोटी ७५ लाख रुपये खर्च करून ६० फूट उंचीचा हा ब्रॉंझ धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळा उभारणीचे काम मेसर्स राम सुतार आर्ट क्रियेशन्स, दिल्ली यांनी उभारले असून याच्या मजबुतीसाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुतळ्याच पूजन केल्यानंतर परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केलं. पुतळा उभारणीसाठी हातभार लावलेल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राष्ट्रीगीत आणि राज्यगीत म्हणून या कार्यक्रमाची सांगता झाली.
मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला हा पुतळा म्हणजे शौर्याचे प्रतीक आहे. येथे आल्यावर प्रत्येकाला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.आमच्या सरकारने या पुतळा दुर्घटनेनंतर भव्य दिव्य असा छत्रपतींचा पुतळा उभारावा यासाठी लगेचच प्रयत्न सुरू केले होते आणि त्यानंतर विक्रमी वेळेत हा शिवछत्रपतींचा पुतळा या ठिकाणी उभा राहिला. नौदल दिना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकणी पुतळ्याचे अनावरण झाले होते. आज नव्याने उभारण्यात आलेल्या या शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याचे पूजन करण्यासाठी आम्ही आलो आहोत. सद्यस्थितीत नरेंद्र मोदी हे भारताच्या जवानांना बळ देण्याचे काम करत आहेत, ते देखील एक प्रकारचे शिवकार्य आहे असे शिंदे यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रीगीत आणि राज्यगीत म्हणून या कार्यक्रमाची सांगता झाली.