

रायगड : आपत्ती सांगून येत नाही, परंतु आपत्तीमुळे होणारे नुकसान रोखणे आपल्याच हातात आहे. शून्य जीवितहानी हेच आपले प्रमुख ध्येय असावे, असे स्पष्ट निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले.
पावसाळा पूर्वीच्या तयारीचा आढावा घेताना दूरदृष्य प्रणालीद्वारे कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकार्यांसह विविध यंत्रणांच्या अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केले. या बैठकीस जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, नगरपालिका अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, कोकण रेल्वे, एसटी महामंडळ, नागरी संरक्षण, हवामान विभाग व औद्योगिक आरोग्य सुरक्षा विभागातील अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
आयुक्त डॉ. सुर्यवंशी म्हणाले की, कोकणात पावसाळ्यापूर्वी अचूक नियोजनाची आवश्यकता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कोकण विभागात सरासरी 3 हजार 158.17 मिमी पावसाची नोंद झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक 3 हजार 994.40 मिमी पाऊस झाला होता.
त्यामुळे संभाव्य नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी संपूर्ण कोकण विभागात योग्य नियोजनाची गरज आहे. जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून संबंधित प्राधिकरणाकडून मंजूरी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणात सध्या 2 हजार 989 शोध व बचाव पथके कार्यरत असून त्यात एकूण 20 हजार 278 प्रशिक्षित सदस्य आहेत. या सदस्यांनी आपदा मित्र उपक्रमाअंतर्गत तालुका व जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेतले आहे. मे 2025 अखेरपर्यंत मॉकड्रिल्स राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माधुरी डोंगरे (तहसीलदार महसूल) उमेश शिर्के (विभागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कोकण विभाग) यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये आणि महानगरपालिका स्तरावर 24ु7 आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कक्षात संगणक, इंटरनेट, ई-मेल, दूरध्वनी, हॉटलाइन सेवा उपलब्ध असावी. आपत्तीशी संबंधित कोणतीही माहिती तत्काळ शासनाला कळवावी. नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींना तत्काळ प्रतिसाद द्यावा. अशा सूचना आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी यावेळी दिल्या. तसेच नशीे उर्रीीरश्रीूं हे फक्त घोषवाक्य नाही, तर प्रत्येक घटकाने अंगीकारायचे ध्येय आहे, असे सांगत आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी प्रत्येक यंत्रणेला सज्जतेचे आणि समन्वयाचे आवाहन केले.
कोकण विभागात 09 मोठे, 09 मध्यम प्रकल्प आणि 143 लघु प्रकल्प अशी धरणे आहेत. पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धरणे भरल्यास, नियोजित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करावा व नागरिकांना वेळीच इशारा द्यावा. यासाठी स्थानिक प्रशासनाने (उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जलद प्रतिक्रिया देण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करावा. विसर्गाच्या आधी संबंधित यंत्रणांना सूचना देणे आवश्यक आहे, विशेषतः जेथे पाण्याचा धोका संभवतो. धबधब्यांच्या ठिकाणी जाणार्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजन करावे. अशा ठिकाणी जवळपासच्या रीसॉर्ट, हॉटेल मध्ये साहसी खेळांवर बंदी आणावी अशा ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे नियोजन करावे.
पावसाळ्यात पूर, दरड कोसळणे, वीज कोसळणे, चक्रीवादळ, झाडे/इमारती कोसळणे, रस्ते बंद होणे या घटना घडतात. अशावेळी गउइ, डंपर, वूड कटर, ट्रक अशी यंत्रसामग्री तत्काळ उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. बाधित नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी शाळा, मंदिर, हॉल इ. ठिकाणे निवासासाठी सज्ज ठेवावी व पाणी, अन्न, वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात. धरणातील पाण्याचा विसर्ग नियोजित पद्धतीने करावा व स्थानीय प्रशासनाने विसर्गापूर्वी नागरिकांना वेळीच इशारा द्यावा. एनडीआरएफ च्या तुकडयांना तैनात ठेवावेत,असे निर्देश दिले आहेत.