Panvel Municipal Election Result 2026
पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणांइतकेच ‘नोटा’ म्हणजेच None of the Above या पर्यायाने लक्ष वेधून घेतले. ७८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल २४५ उमेदवार रिंगणात होते. एकूण मतदारसंख्या ५ लाख ५४ हजार ५७८ इतकी असताना केवळ ५६ टक्के मतदान झाले. म्हणजेच ३ लाख ८ हजार ७०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानात ‘नोटा’ला तब्बल ४३ हजार २११ मते मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
लोकशाही व्यवस्थेत ‘नोटा’ हा पर्याय केवळ एक तांत्रिक सुविधा नसून मतदारांच्या असंतोषाचा थेट आवाज मानला जातो. पनवेलसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला न पसंत करता ‘नोटा’ची निवड करणे, ही बाब राजकीय पक्षांसाठी आत्मपरीक्षणाची घंटा ठरली आहे. निवडणूक लढवणाऱ्या २४५ उमेदवारांपैकी एकाही उमेदवारावर विश्वास न टाकता ४३ हजारांहून अधिक नागरिकांनी ‘नोटा’ दाबणे, हे आकडेवारीत लहान वाटले तरी त्यामागचा संदेश अतिशय गंभीर आहे.
या निवडणुकीत प्रमुख पक्षांमध्ये तीव्र लढत दिसून आली. अनेक प्रभागांत विद्यमान नगरसेवक, नातेवाईकांतील राजकीय संघर्ष, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांची चुरस पाहायला मिळाली. मात्र या सर्व राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर ‘नोटा’कडे वळलेले मतदान हे मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याचे द्योतक मानले जात आहे. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, पारदर्शक कारभार आणि विश्वासार्ह नेतृत्व या मुद्द्यांवर उमेदवार अपयशी ठरल्याची भावना या मतदानातून व्यक्त होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
विशेष म्हणजे, ‘नोटा’ला मिळालेली ४३ हजार २११ मते ही अनेक उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत. काही प्रभागांमध्ये विजय-पराभवाचा फरक अत्यंत कमी असताना ‘नोटा’ची संख्या निर्णायक ठरू शकली असती, असा सूरही उमटत आहे. जरी ‘नोटा’मुळे थेट कोणाचा पराभव किंवा निवड रद्द होत नसली, तरी लोकशाहीतील हा निषेधाचा मार्ग राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.
‘नोटा’चा वाढता कल हा मतदार जागरूकतेचा परिणाम आहे. मतदार आता केवळ पक्षनिष्ठेवर मतदान न करता उमेदवारांची पार्श्वभूमी, कामगिरी आणि प्रामाणिकपणा याचा विचार करून निर्णय घेत आहेत. अपेक्षांना पात्र उमेदवार न मिळाल्यास मतदार ‘नोटा’चा पर्याय निर्भीडपणे स्वीकारत आहेत, हे पनवेल निवडणुकीने स्पष्ट केले आहे.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीतील ‘नोटा’चे हे आकडे केवळ आकडेमोड नसून लोकशाहीतील जनभावनेचा आरसा आहेत. पुढील निवडणुकांमध्ये पक्षांनी आणि उमेदवारांनी या संकेताकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर ‘नोटा’चा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारांचा हा शांत पण ठाम निषेध भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा ठरू शकतो.
१. प्रभाग १,२ आणि ३ = ५,२१५
२. प्रभाग ४,५ आणि ६, = ८,५९६
३. प्रभाग ७,८,९ आणि १० = ८,८०८
४. प्रभाग ११,१२ आणि १३ = ६,७९६
५.प्रभाग १४,१५ आणि १६ = ८,१०६
६. प्रभाग १७,१८,१९ आणि २० = ५,७१७