पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर निवडणूक रिंगणाचे चित्र स्पष्ट झाले आहे.
एकूण 343 उमेदवार निवडणूक मैदानात असून, त्यापैकी तब्बल 122 उमेदवार अपक्ष असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. आज, 2 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने दिवसभर राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
मुख्य राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्या आणि मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्याने अनेक प्रभागांत बहुकोनी लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवारांची वाढलेली संख्या ही पनवेल निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरत असून, स्थानिक प्रश्नांवर थेट मतदारांशी संवाद साधत हे उमेदवार प्रचारात सक्रिय झाले आहेत.
यामुळे काही प्रभागांत पक्षीय उमेदवारांसमोरही कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने शेवटच्या क्षणी अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काही उमेदवार आपले अर्ज मागे घेतील, तर काही ठिकाणी राजकीय समजूतदारपणा, दबावतंत्र किंवा स्थानिक समीकरणांमुळे अनपेक्षित निर्णय घेतले जाण्याचीही चर्चा आहे. अर्ज माघारीनंतरच अंतिम उमेदवारांची यादी निश्चित होणार असून त्यानंतर प्रचाराला अधिक वेग येणार आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत मोठ्या आर्थिक उलाढालीची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू असून, लाखो रुपयांची देवाणघेवाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, एकूणच 343 उमेदवारांचे रिंगण, त्यामध्ये 122 अपक्षांची महत्त्वाची उपस्थिती आणि आजची अर्ज माघारीची अंतिम तारीख यामुळे पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026 निर्णायक व रंगतदार ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.