

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचा हिशोब निवडणूक निकाल लागल्यानंतर 30 दिवसाच्या आत खर्चाचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्येक प्रभागनिहाय निवडणूक खर्च संनियंत्रण पथक गठित करण्यात आले आहे. या निवडणूक खर्च संनियंत्रण पथकातील लेखाधिकारी, लेखापाल यांची बैठक महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे प्रमुख लेखापाल (वित्त) वैशाली देसाई, गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वित्तीय सल्लागार व प्रमुख लेखाधिकारी चारूलेखा खोत यांच्यासह प्रशासकीय विभागातील लेखाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवणे, खर्चाच्या मर्यादांचे पालन होते की नाही, याची पडताळणी करणे, तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. खर्च निरीक्षक, लेखा पथके, भरारी पथके व व्हिडिओ पाळत पथकांच्या कार्यपद्धतीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या खर्चाची नोंद, संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे, बेकायदेशीर खर्च रोखण्यासाठी तातडीची कार्यवाही करणे, यासह विविध सूचनाही देण्यात आल्या.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्च स्वतंत्र बँक खात्यातून करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना प्राप्त होणारा निधी, देणगी बाबतच्या तपशीलाची (स्वनिधी, पक्ष निधी, भेट, कर्ज) माहिती नमुना क्रमांक 1 व उमेदवाराने केलेल्या खर्चाच्या तपशीलाची माहिती नमुना क्रमांक 2 मध्ये निवडणूक निकाल लागल्यापासून 30 दिवसांत प्रतिज्ञापत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.
महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. यात अ वर्ग महापालिकेसाठी 15 लाख खर्च करण्याची मर्यादा आहे. त्यामुळे मुंबई निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला 15 लाख रुपयापेक्षा जास्त खर्च होणार नाही, त्याची दक्षता घ्यावी लागणार आहे.