

मुंबई : केंद्र सरकारने तंबाखूजन्य उत्पादनांवर 1 फेबुवारीपासून कराची घोषणा केल्याने एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर भावात घसरण झाली. वित्तीय संस्थांचे शेअर भावही कोलमडल्याने नववर्षातील पहिल्याच दिवशी शेअर निर्देशांकाची सुरुवात नकारात्मक राहिली. सेन्सेक्स 32 अंकांनी खाली आला असून, निफ्टी निर्देशांकात 16 अंकांनी वाढ झाली.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स 85,188 आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 26,146 अंकांवर स्थिरावला. केंद्र सरकारने तंबाखूजन्य उत्पादनांवर कर जाहीर केल्याने एफएमसीजी कंपन्यांचे शेअर 3.17 टक्क्यांनी गडगडले. आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्सच्या शेअर भावातही घसरण झाल्याने निर्देशांकाचे सर्वाधिक नुकसान झाले. लार्सन अँड टुर्बो (एलअँडटी), इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर भावात वाढ झाल्याने निर्देशांकाची घसरण रोखल्या गेली.
आयटीसीचा शेअर भाव 9.69 टक्क्यांनी गडगडल्याने एफएमसीजी निर्देशांकाचे मोठे नुकसान झाले. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स 1.57, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या शेअर भावात 1.53 टक्क्यांनी घट झाली. निफ्टी फार्मा निर्देशांक 0.40 आणि हेल्थकेअर निर्देशांक 0.19 टक्क्यांनी खाली आला. निफ्टी बँक निर्देशांक 0.22 आणि फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात 0.19 टक्क्यांनी वाढ झाली.
गतवर्षभरात नीचांकी कामगिरी नोंदवल्यानंतर गुरुवारी (दि.1) वर्षाच्या पहिल्या दिवशी रुपयाची कामगिरी निराशाजनक झाली. एका डॉलरचा भाव 89.95 रुपयांवर स्थिरावला. बुधवारच्या सत्रात डॉलरचा भाव 89.87वर बंद झाला होता.
बीएसईतील 4,335 पैकी 2,211 कंपन्यांच्या शेअर भावात वाढ झाली असून, 1,952 कंपन्यांच्या शेअर भावात घसरण झाली, तर 172 कंपन्यांचे शेअर भाव टिकून होते. रिलायन्स, टायटन, लार्सन अँड टुर्बोसह 144 कंपन्यांच्या शेअरने 52 सप्ताहांतील उच्चांकी कामगिरी नोंदवल्याने सेन्सेक्सची घरसण थांबली. आयटीसी, सीमेन्स एनर्जी इंडिया, क्लीन अँट टेक्नोलॉजीसह 87 कंपन्यांच्या शेअरभावाने 52 सप्ताहातील नीचांकी कामगिरी नोंदवल्याने सेन्सेक्समध्ये घट झाली.