पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आज स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांनी स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्याकडे सादर केले. या अंदाजपत्रकात शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देत पायाभूत सुविधा विकास, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता, शिक्षण तसेच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
यावेळी विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे, लेखा अधिकारी संग्राम व्होरकाटे, स्थायी समितीचे सर्व सदस्य, उपमुख्यलेखा परीक्षक संदिप खुरपे उपस्थित होते.
खर्चाच्या बाबतीत आस्थापना खर्चासाठी 193 कोटींची तरतूद करण्यात आली असून, नविन प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल 200 कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत. शहरातील होल्डिंग पॉन्डसाठी 60 कोटी, तसेच बहुउद्देशीय समाजमंदिर बांधकामासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करत दैनंदिन बाजार विकसित करण्यासाठी 64 कोटी, गावठाण परिसरातील पायाभूत सुविधांसाठी 61 कोटी, तसेच घनकचरा संकलन,वाहतूक व मनुष्यबळ यांच्यासाठी 318 कोटींची मोठी तरतूद करण्यात आली आहे.
वैद्यकीय व आरोग्य सेवांसाठी 194 कोटी, अग्निशमन व सुरक्षा व्यवस्थेसाठी 83 कोटी, तसेच रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरणासाठी 358 कोटींचा निधी प्रस्तावित आहे. शिलार धरण प्रकल्पासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मलनिस्सारण व पाणी पुर्नवापर प्रक्रिया केंद्र व इतर कामांसाठी 115 कोटींची तरतूद, विद्युत व्यवस्थेसाठी 147 कोटी, भुयारी गटार व मलनिस्सारणासाठी 164 कोटी , शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शिक्षणासाठी 174 कोटी, माहिती व तंत्रज्ञानासाठी 143 कोटी, तसेच शासकीय अमृत योजनेअंतर्गत विविध विकासकामांसाठी 117 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय भूसंपादन, सार्वजनिक सुविधा आणि नगररचना यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी प्रस्तावित आहे.
महापालिकेने सादर केलेले हे अंदाजपत्रक शहराच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यांचा समतोल साधत विकासाला चालना देणारे ठरणार आहेत.मंगेश चितळे, आयुक्त मनपा
सन 2026-2027 च्या अंदाजपत्रकानूसार जमा खर्चाच्या बाबींचा तपशील पहाता एकुण जमा रूपये 4 हजार 853 कोटी 90 लाख (आरंभी शिलकी सह) इतके असून एकुण खर्च रूपये 4 हजार 853 कोटी 80 लाख इतका असून अखेर शिल्लक रूपये 10 लाख आहे.