Navi Mumbai International Airport Opening Date
पनवेल : पनवेल परिसरात उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे येत्या 30 सप्टेंबरला लोकार्पण करण्याचे नियोजन सिडको प्रशासनाने सुरू केलेले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे.याची जोरदार तयारी अदानी उद्योगसमुहासह सिडको प्रशासनाने सुरू केलेली आहे.यासाठी जोडरस्ते,ठिकठिकाणची रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू झालेली आहे.त्याच बरोबरच या विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नावं द्यावे,या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त कमालीचे आक्रमक झालेेले आहेत.
विमानतळ प्रकल्पाचे अंतिम टप्यातील काम पूर्ण उदघाटनापूर्वी विविध हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. यामध्ये विमानतळाच्या अंतर्गत स्वच्छता व सजावटीचे काम तसेच विविध विजेवरील उपकरणाची चाचणी केली जात आहे. विमानतळ सूरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवान टप्याटप्याने या विमानतळाच्या सूरक्षेचे हस्तांतरण करत आहेत. विमानतळाच्या उद्घाटनानंतर प्रत्यक्षात प्रवासी आणि लॉजिस्टिक विमान उड्डाणासाठी अजून एक ते दिड महिना लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
नवी मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या आर्थिक चलनाला गती देणा-या या प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांच्या नेत्याचेच नाव दिले पाहिजे, ही मागणी गेल्या तीन वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी जोरदार लावून ध्रली आहे. यामुळे येथील सर्व प्रकल्पग्रस्तांकडून विमानतळात नोकर मिळण्याच्या मागणीपेक्षा विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी येथील तरूण झटताना दिसत आहेत.
विमानतळ उदघाटनाला पंतप्रधान मोदी हेच दि.बांच्या नावाची घोषणा करतील अशी चर्चा असताना करंजाडे वसाहतीकडून विमानतळ मागनि उलव्याकडे जाणा-या मार्गावरील दि. बा. पाटील यांच्या नावाचा फलकावर पडदा टाकल्याने अशा पद्धतीने इतर दि. बा. पाटील नावांचे फलक झाकले जातील का,अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
दिबांच्या नावाचे फलक झाकले
उदघाटनापूर्वीच करंजाडे वसाहतीकडून विमातळाकडे जाणा-या मार्गिकवर दि. बा. पाटील यांच्या नावाच्या विमानतळ मार्गिका दर्शविणा-या फलकाशेजारील मार्गच गडद हिरव्या पडद्याने झाकल्याने उदघाटनापूर्वी दि. बांचे नाव झाकण्याच्या मागे कोण कारस्थानी आहे याचीच जोरदार चर्चा प्रकल्पग्रस्तांमध्ये सुरू आहे. विमानतळावर पोहचण्यासाठी पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक उभारले आहेत. या फलकांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख असला तरी प्रकल्पग्रस्तांनी त्याच फलकांवर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख केलेले फलक चिकटविलेलेे आहेत.