

श्रीवर्धन : भारत चोगले
काबाडकष्ट करुन आयुष्याची वाटचाल करणार्या प्रत्येकाला निदान मृत्यूनंतरचा प्रवास तरी खडतर न होता सुरळीत व्हावा,अशी माफक अपेक्षा असते.पण श्रीवर्धन तालुक्यातील कोेंडेगाव येथील ग्रामस्थांचा मृत्यूनंतरचा प्रवासही खडतरच झाल्याचे नशिबी दिसत आहे.गावाकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी पूल नसल्याने मृतदेह वाहून नेण्यासाठीही ग्रामस्थांना थेट नदीत उतरावे लागत आहे.
बोर्ली पंचतन हद्दीतील कोंडे गाव आजही विकासाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. दोनच दिवसापूर्वी कोंडे येथील एका व्यक्तीचे निधन झाले.त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांची अंत्ययात्रा भर पावसात नदीतील पाण्यातून घेऊन जावी लागली.
एवढ्या तंत्रज्ञानाच्या युगात लोकांना मृतदेहही नदीतून वाहून न्यावा लागतो, याहून मोठा प्रशासनाचा अपमान कोणता? हा प्रश्न केवळ कोंडे गावापुरता मर्यादित नसून, तालुक्यातील अनेक गावांवर याच स्वरूपाची परिस्थिती आहे. हे गंभीर मानवाधिकाराचे उल्लंघन असून त्वरित दखल घेणे आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून, आता तरी जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. कोंडे ग्रामस्थांना अजून किती काळ मृतदेह नदीतून वाहून न्यायची लाजिरवाणी वेळ येणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
दोन वर्षापासून पुलाची मागणी
गेल्या दोन वर्षांपासून कोंडे गावातील ग्रामस्थ पुलाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. जिल्हा परिषद सीईओ, जिल्हाधिकारी, संबंधित विभाग प्रमुख यांना लेखी अर्जासह व्हॉट्सअॅप संदेशही पाठवले गेले. तातडीने पुलाचे काम हाती घ्या, गावाला न्याय द्या असा थेट आग्रह ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केला आहे. तरीसुद्धा अद्याप काहीच हालचाल झाली नसल्याने गावकर्यांमध्ये संताप वाढत आहे. हा प्रश्न यापूर्वीच सुटला असता. आज मृतदेह वाहून नेण्यासाठी नदीत उतरावे लागत आहे, याला जबाबदार कोण? असा ग्रामस्थांचा थेट सवाल आहे.