

उरण : राजकुमार भगत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने हवाई मार्गाची सुरक्षितता आणि परिसरातील पक्ष्यांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई विमानतळ परिसरात बर्ड गार्ड ही संस्था नियुक्त केली असून या संस्थेद्वारे येथे येणार्या पक्षांवर नजर ठेवली जाणार असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केली जाणार आहे.
एनएमआयएच्या या निर्णयामुळे पर्यावरणवाद्यानी स्वागत केले आहे. मात्र, नॅटकनेक्ट फाउंडेशनसारख्या पर्यावरणवादी संस्थांनी फ्लेमिंगोसह इतर पाणथळ पक्ष्यांचे घर असलेल्या नैसर्गिक जागा तातडीने ‘संवर्धन राखीव’ म्हणून घोषित करण्याची मागणी लावून धरली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकार्यांनी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेला माहिती दिली आहे की, त्यांनी वन्यजीव धोका व्यवस्थापन कार्यक्रम विकसित केला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अभ्यासानुसार, स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी विमानांच्या उड्डाण मार्गापेक्षा खूप खाली उडतात.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या निरीक्षणानुसार, पक्ष्यांची स्थानिक हालचाल सामान्यतः समुद्रसपाटीपासून 50 मीटरपेक्षा कमी उंचीवर असते. विमानतळ धावपट्टीवर विमाने उड्डाण किंवा लँडिंग करताना, ती ठाणे खाडीतील पक्ष्यांच्या उड्डाण उंचीपेक्षा जास्त उंची राखतात. विमानतळाने ‘बर्डगार्ड इंडिया’ या संस्थेला 13 किमी त्रिज्येमध्ये वन्यजीव निरीक्षणाचे काम दिले आहे.
एनएमआयएने बीएनएचएसच्या अंतिम शिफारसींनुसार जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन करण्यास वचनबद्धता दर्शविली आहे. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी एनएमआयएच्या आश्वासनाचे स्वागत केले आहे, पण त्याच वेळी राज्य सरकारला तातडीने पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. कुमार यांनी मागणी केली आहे की, राज्य वन्यजीव मंडळाच्या शिफारशीनुसार फ्लेमिंगो तलावाला ‘संवर्धन राखीव’ म्हणून मान्यता देण्यासाठी तातडीने सरकारी निर्णय जारी करावा अशी मागणी आता केली जाऊ लागली आहे.
एनएमआयए प्रशासन हवाई सुरक्षा आणि जैवविविधता यांच्यात संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करत असले तरी, पर्यावरणवाद्यांच्या मते, येथील नैसर्गिक पाणथळ जागांना त्वरित कायदेशीर संरक्षण देणे आवश्यक आहे, जेणेकरून लाखो पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित राहील.