

पुणे: पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मुदतीत तब्बल 90 टक्के भूसंपादनाला संमती मिळाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना संमती देण्यासाठी आणखी मुदत द्यावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनाने मान्य केली आहे. त्यानुसार गुरुवारपर्यंत (दि. 25) मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
दरम्यान, शुक्रवारपासून (दि. 26) जमीन मोजणीला प्रारंभ करण्यात येणार असून, जमिनीव्यतिरिक्त असलेल्या मालमत्तेची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिज्ञापत्र देण्यास सांगण्यात आले आहे; जेणेकरून मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्याचे मूल्यमापन करून त्याचा मोबदल्यात समावेश केला जाणार आहे. मोजणीसाठी सोमवारपासून (दि. 22) शेतकऱ्यांना नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. (Latest Pune News)
पुरंदर विमानतळासाठी सुमारे 3 हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांकडून त्यापूर्वी संमतिपत्रे घेण्यात आली आहेत. त्यासाठी 26 ऑगस्ट ते 18 सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत सुमारे 2 हजार 80 शेतकऱ्यांनी एकूण 2 हजार 700 एकर जमिनीच्या संपादनासाठी संमती दर्शविली आहे. त्यानुसार पत्रही दिले आहे. मात्र, अजूनही 10 टक्के अर्थात 300 एकर जमिनीच्या संपादनासाठी संमती आलेली नाही.
मुदतीत संमती न दिल्याने या शेतकऱ्यांना विकसित भूखंडाचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा, यासाठी सर्व गावांमधील सरपंच आणि ग्रामस्थांनी ही मुदत आणखी वाढवून द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार ही मुदत आता गुरुवारपर्यंत (दि. 25) वाढवून दिली आहे.
98 टक्के मुंजवडीकरांची भूसंपादनाला संमती
आत्तापर्यंत मुंजवडी येथील 98 टक्के जमिनीसाठी संमती देण्यात आली आहे; तर उदाचीवाडी, एखतपूर, खानवडी येथील गावांमधील 95 टक्के तसेच पारगाव, वनपुरी आणि कुंभारवळण येथील 85 टक्क्यांपेक्षा जास्त जमिनीचे संमतिपत्रे देण्यात आली आहेत.