Murud Janjira Holi Festival Pudhari
रायगड

Murud Janjira Holi Festival: मुरुड किनाऱ्यावर होळीचा जल्लोष; सजलेल्या बोटींचा आगळावेगळा सोहळा

मासेमारीत घट असूनही कोळी बांधवांचा उत्साह अबाधित; वेताळ देवाचे दर्शन घेऊन नौकांची जल्लोषात गावाकडे पुनरागमन

पुढारी वृत्तसेवा

मुरुड-जंजिरा : सुधीर नाझरे

मुरुडमध्ये मागील चार महिन्यांपासून वातावरणातील बदलल्यामुळे मासे फार अल्प प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे प्रमुख आर्थिक स्रोतावर गंभीर संकट असूनसुद्धा होळी सणात याचे कुठेही सावट दिसत नाही. होळी सण साजरा करण्यासाठी असंख्य बोटी किनाऱ्यावर येत आहेत. मुरुड परिसरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. होळीच्या 7 दिवस आधी मासेमारीसाठी गेलेल्या बोटी होळीसाठी परतात तेव्हा किनाऱ्यावर येण्याआधी आपली बोट समुद्रात असतानाच फुलांनी सजवतात, भगवे झेंडे ,पिवळे झेंडे ,बोटीवर डिझे स्पीकर लावून घरी परताना कोळी गाणी वाजवत, नाचत गुलाल उधळत मुरुड किनाऱ्यावर येत आहेत. टाके वाजवत येणाऱ्या बोटींना पाहण्यासाठी मुरुडकर एकदरा पुलावर गर्दी करु लागलेले आहेत. .आपली सजलेली बोट जेटीवर येताना तिचे स्वागत घराचे लहान मुले ,महिला पूजन करू लागल्या आहेत. ,हा आगळावेगळा सोहळा मुरुडच्या किनाऱ्यावर मंगळवारपासून सुरु झालाआहे.

कोकणातील समस्त कोळी समाजाचा आवडता सण म्हणजे होळी. होळी सुरू होण्याअगोदर खोल समुद्रात सापडलेली मासळी मुंबईत विकून आनंदात होड्या आपल्या मायभूमीत येत असतात. सध्या असंख्य होड्या मुरुड तालुक्यातील नांदगाव, राजपुरी, एकदर, आगरदांडा, दिघी येथे येत असून, होळीसाठी मुंबईतून समस्त कोळी बांधव येत आहेत.

तालुक्यात सुमारे 650 होड्या असून, या सागरीकिनाऱ्याला लागलेल्या आहेत. या सजलेल्या नौका बंदरात दाखल होत असताना संबंधित नौकांच्या घरची माणसे खूप आतुरतेने वाट पाहात असतात. मासेमारी करून आल्यानंतर सर्व कोळी बांधव बोटीवर काम करणाया सहकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सुख-दु:खात सामिल होऊन आपले आपापसातील संबंध दृढ करीत असतात. बोटीवरील एखादा खलाशी आर्थिकदृष्ट्या कमजोर असले तर होळी सण साजरा करण्यासाठी आर्थिक मदत करीत असतात. होळीनंतर दुसया दिवशी धुलीवंदनचा सणसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

वेताळ देवाला साकडे

मुंबईतून निघताना बोटी विविध रंगबिरंगी कापडाच्या झुलीने सजविल्या जातात. विविध फुले, विविध रंगाच्या पताका, रंगबिरंगी झेंडे व कोळी लोक पारंपरिक वेशभूषा परिधान करून प्रथम खंदेरी येथे वेताळ देवाचे दर्शन घेऊन त्याची पूजा-अर्चा करून येणाऱ्या दिवसात चांगली मासळी मिळावी,समुद्रदेवतेपासून आपले सदैव रक्षण व्हावे, अशी वेताळ देवापुढे प्रार्थना करतात. सालाबादप्रमाणे या वेळीही मुरुड येथील चंद्रकांत सरपाटील यांच्या दोन्ही नौका व मुरु ड तालुक्यातील समस्त कोळी बांधवांच्या नौका वेताळ देवाचे दर्शन घेऊन घरी परतलेल्या आहेत. होळी सणाच्या काही दिवस अगोदर या नौका आपल्या गावी दाखल होत असतात.

कोळी बांधव होळी हा सण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतात. सर्व वैमनस्य विसरून गुण्यागोविंदाने हा सण साजरा करीत असतात. या होळीमध्ये आवर्जून सहभागी होतात. कोळी समाजाचा होळी सण हा प्रकर्षाने साजरा केल्याचे जाणवते
प्रकाश सरपाटील, कोळी बांधव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT