माथेरान : मिलिंद कदम
चार वर्षाच्या प्रशासक काळामध्ये माथेरानच्या पर्यटनाचे तीन तेरा वाजल्यानंतर आता नगरपालिका सभागृह अस्तित्वात आल्यानंतर माथेरानच्या पर्यटन वाढीकरिता धडाकेबाज निर्णय घेतानाच पर्यटन विकासाकरिता भरघोस निधी आणून माथेरानचा पर्यटन विकास व पर्यटन वाढीकरता प्रकल्प आणणे हे मोठे आव्हान असणार आहे.
मागील काळामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये माथेरानमध्ये प्रशासकीय निधी आला नव्हता व त्यामुळे नगरपालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे. उपलब्ध निधी वापरला गेल्याने आता माथेरानच्या पर्यटन विकासासाठी निधीच उपलब्ध नाही त्यामुळे माथेरानचे पर्यटन वाढायचे असेल तर नवनवीन प्रकल्प माथेरानमध्ये येणे गरजेचे आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने प्रेक्षणीय स्थळांवर सुशोभीकरण, माथेरानमध्ये अल्पावधीतच प्रसिद्ध झालेला व्हॅली क्रॉसिंग थरार, लेझर शो येथील गणपती विसर्जन घाटावर बोटिंग
सारखा प्रकल्प अवकाश गंगा केंद्र पुनर्जीवित करणे माथेरानमधील सर्वात उंचावरील पेमास्टर पार्क येथे संध्याकाळच्या वेळी पर्यटकांना आकर्षित करण्याकरता विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन व परिसराचा विकास, येथील शार्लेट लेक परिसरामध्ये पर्यटकांकरिता अद्यावत गार्डन उभारणी व बसण्याची सोय ज्यामुळे येथील तरुणांनाही रोजगार उपलब्ध होईल सारखे प्रकल्प तर पर्यटकांना सर्वात जास्त भेडसावणार शौचालय व बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे सारखे प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे जे करणे ही काळाची गरज आहे.
माथेरानमधील रस्ते चांगले करून पर्यटकांकडून घेतल्या जाणाऱ्या प्रवासी कराचा मोबदला चांगले रस्ते करून परतावा करणे होईल. मागील दोन महिन्यांपासून माथेरान पर्यटनामध्ये मंदीची लाट आली आहे.
हाजी मलंग येथे सुरू झालेल्या फेन्यकुलर रेल्वेनंतर माथेरानमधील प्रवाशांची संख्या कमालीची घटली होती. माथेरानच्या आजूबाजूला अनेक पर्यटन स्थळे विकसित होत असताना माथेरानची मात्र अधोगती होत आहे.
माथेरानचे मुख्य आकर्षण असलेल्या घोड्यांना ही राजाश्रय देऊन येथील ओलंपिया रेसकोर्सवर पर्यटकांकरिता शासकीय प्रयत्नातून घोड चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र उभारले जाऊ शकते, ठीक ठिकाणी स्थानिक बेरोजगार तरुणांचे गट बनवून पर्यटन पूरक मनोरंजनाचे प्रकल्प सुरू केले जाऊ शकतात व या सर्व गोष्टींसाठी शासकीय पाठबळ व इच्छाशक्तीची गरज असून माथेरानच्या पर्यटन विकासाकरिता येथील पर्यटन पूरक प्रकल्प वाढविणे आता गरजेचे झाले आहे, नाहीतर वर्षातून शंभर दिवस व्यवसाय व बाकीचे दिवस मंदी ही परंपरा अशी चालू राहील यामुळे स्थानिकांना तर काही लाभ होणार नाही परंतु दिवसेंदिवस कर्जाचे ओझे मात्र मोठे होत जाणार आहे.