रायगड : जयंत धुळप
राज्यात सन 2025 यावर्षात एकूण 36 हजार 450 पेक्षा जास्त अपघात झाले असून, त्यामध्ये सुमारे 15 हजार 549 नागरिकांचा मृत्यू झाला तर 32 हजार 177 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. एकूण मृत्यूंपैकी 57 टक्के मृत्यू हे दुचाकीस्वारांचे तर 21 टक्के मृत्यू हे पादचाऱ्यांचे झाले आहेत.
जागतिक स्तरावर रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण सन 2030 पर्यंत 50 टक्के पेक्षा कमी करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार, सेफ सिस्टीम ॲप्रोच अंतर्गत रस्ते अभियांत्रिकी, अंमलबजावणी आणि जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. परिणामी राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सन 2026 वर्ष दुचाकीस्वार आणि पादचारी वाचवा अभियान म्हणून राबविण्याचा निर्णय रस्ते अपघात आढावा बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिल आहे.
दुचाकीस्वार आणि पादचारी वाचवा अभियानात 2026 मध्ये रस्ते अपघातात होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेषत: दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या सहकार्याने तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. ज्या महामार्गावर सर्वात जास्त दुचाकीचे अपघात घडतात अशा, जिल्ह्यांतील पहिल्या तीन प्रमुख राष्ट्रीय राज्य महामार्गावर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करावी व त्यानंतर टप्याटप्याने उर्वरीत अपघातग्रस्त रस्त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करताना जनजागृती व दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येणार आहे.
पादचाऱ्यांचे अपघात ज्या ठिकाणी जास्त होतात, तिथे रस्ते अभियांत्रिकीमधील अनधिकृतपणे विभाजक तोडणे, पदपथांचा अभाव, महामार्गाला चुकीच्या पद्धतीने जोडणारे इतर रस्ते, भौगोलिक परिस्थिति त्रुटी शोधून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उपाययोजनांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी उपाययोजना, पादचारी पथमार्गावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवणे, फुटपाथवरून रस्त्यावर पादचारी येऊ नये म्हणून संरक्षक जाळ्या बसविणे, रस्ता ओलांडण्यासाठी फूट ओवर ब्रिज निर्माण करणे, भुयारी मार्ग तयार करणे, सिग्नल यंत्रणा बसवणे आदिही उपाययोजना करण्याचे नियोजन आहे.
1 जानेवारी 2025 पासून जिल्ह्यात झालेल्या प्रत्येक अपघाताचा एफआयआर संबंधित पोलीस स्टेशनकडून प्राप्त करून, रस्ता सुरक्षा कक्षांतर्गत संबंधित ‘पोलीस स्टेशन क्षेत्र प्रभारी मोटार वाहन निरीक्षकांना ते देवून, अपघाताच्या कारणांचा सखोल अभ्यास व विश्लेषण करण्यात येणार आहे.
मागील तीन वर्षातील अपघात स्थळांची माहिती गुगल मॅपवर प्लॉट करून त्याची तुलना करून अपघातग्रस्त ठिकाणाची तीव्रता शोधण्यात येवून सुसूत्रतेसाठी विशेष रंगसंगतीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. यामध्ये सुसूत्रता राखण्यासाठी प्रथम वर्ष (2023) हिरवा रंग, दुसरे वर्ष (2024) : नारंगी रंग, तिसरे वर्ष (2025) : लाल रंग निश्चित करण्यात आले आहेत. बदलत्या वर्षानुसार अशीच रंगसंगती क्रमशः पुढील वर्षासाठी ठेवण्यात येवून अशा ठिकाणावर उपाययोजना करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील महामार्गावरील सर्वाधिक अपघात घडणारे पहिले तीन रस्ते निश्चित करून फक्त त्याच रस्त्यावर अपघातग्रस्त ठिकाणी रडार आधारित इंटरसेप्टर वाहने तैनात करुन, त्यानंतर टप्याटप्याने उर्वरीत अपघातग्रस्त रस्त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अपघात होणाऱ्या रस्त्यावर विशेष मोहिमेद्वारे दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले आहे की नाही, याची रडार आधारित इंटरसेप्टर वाहनांद्वारे तपासणी करून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
दुचाकीस्वार आणि पादचारी वाचवा अभियानात 2026 मध्ये रस्ते अपघातात होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेषत: दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. ज्या महामार्गावर सर्वात जास्त दुचाकीचे अपघात घडतात अशा, जिल्ह्यांतील पहिल्या तीन राष्ट्रीय राज्य महामार्गावर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करावी व त्यानंतर टप्याटप्याने उर्वरीत अपघातग्रस्त रस्त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.