रायगड : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशिक्षणासाठी आणि क्षमता वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. रामफेड-रायगड जिल्हा एम पॅक्स सेवा सहकारी संस्थांचा महासंघ मर्यादित, अलिबाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अलिबाग येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हा करार संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन रामफेडच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमास जयंतभाई पाटील, माजी आमदार तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तीटकारे, विभागीय समन्वयक (कोकण व पश्चिम महाराष्ट्र) अरुण काकडे, डॉ. भास्कर पाटील, पणन व्यवस्थापक, प्रशांत चासकर, शेतमाल व तारण व्यवस्थापन तज्ञ, रामफेडचे चेअरमन निनाद विकास पाटील, तसेच रामफेडचे पदाधिकारी, संचालक मंडळ, प्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामफेडच्या संचालक मंडळातील विनायक तुकाराम गिजे , तुकाराम दामोदर पाटील , प्रकाश गण्या ठाकूर , गोपीनाथ मारुती गंभे , बबन चिंधू भालेगाव आणि गजानन शाम झोरे हे संचालकही यावेळी उपस्थित होते.
सहकार क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेता महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना सक्षम प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, प्रमाणपत्र व्यवस्था, संस्थात्मक क्षमता विकास आणि सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन, विद्यमान संस्थांचे कामकाज अधिक सक्षम करणे, व्यवस्थापन कौशल्य वृद्धी आणि सहकार क्षेत्रातील व्यावसायिकता वाढीस लागणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
या सामंजस्य कराराअंतर्गत सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी, कर्मचारी आणि सभासद यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सहकार क्षेत्रातील कायदे, नियम, लेखापरीक्षण, प्रशासन, आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापन यावरील सखोल प्रशिक्षण देण्यात येणार असून शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयं-सहायता गट आणि ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्थांनाही या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ या प्रशिक्षण केंद्रासाठी तांत्रिक मार्गदर्शन, अभ्यासक्रम निर्मिती, प्रशिक्षण पद्धती, गुणवत्ता नियंत्रण तसेच सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमांची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. रामफेडतर्फे या प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, दैनंदिन व्यवस्थापन, प्रशिक्षणार्थी नोंदणी, कार्यक्रमांचे आयोजन, प्रशासकीय व्यवस्था आणि स्थानिक स्तरावरील समन्वयाची जबाबदारी पार पाडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अधिकाधिक सहकारी संस्थांना या प्रशिक्षण प्रक्रियेशी जोडून त्यांच्या कार्यक्षमता आणि क्षमतावृद्धीवर रामफेड विशेष भर देणार आहे.
या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी संस्था, पतसंस्था, शेतकरी गट, स्वयं-सहायता गट, महिला आणि युवकांना सहकार क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार असून भविष्यात प्रशिक्षित आणि सक्षम सहकार नेतृत्व तयार करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कराराबाबत उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, सहकार क्षेत्रात बदलत्या काळानुसार प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान, कायदेशीर समज, व्यवस्थापन कौशल्य आणि आर्थिक शिस्त अत्यंत आवश्यक झाली आहे. रामफेड आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभे राहणारे हे प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल.
सामंजस्य करारानंतर पहिल्या टप्प्यात सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील. त्यानंतर सहकारी संस्था स्थापन करू इच्छिणाऱ्या गटांना मार्गदर्शन, शेतकरी उत्पादक संस्था व स्वयं-सहायता गटांसाठी विशेष कार्यक्रम तसेच सहकार क्षेत्रातील कायदे, लेखा, व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास विषयक प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. रामफेडच्या या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून सहकारी संस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध, कायदेशीरदृष्ट्या सजग आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.